सत्तेतून बाहेर या, मग दाखवतो…; संजय राऊतांचा धडक इशारा
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खऱ्या शिवसेनेचे गुंडे असाल तर समोर या असे थेट आव्हान दिले आहे. दिघे यांच्यावरील टीकेनंतर राऊत अधिक आक्रमक झाले असून, शिंदे गटावर आनंद दिघे यांच्या निष्ठेशी प्रतारणा केल्याचा आरोप केला. त्यांनी आयोगावरही निशाणा साधत, सत्तेतून बाहेर येऊन लढण्याचे आवाहन केले.
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. मी खऱ्या शिवसेनेचा गुंडा आहे आणि तुम्ही जर खऱ्या शिवसेनेचे गुंडे असाल तर समोर येऊन बोला, असे राऊत यांनी म्हटले आहे. आनंद दिघे यांच्यावरील टीकेनंतर राऊत अधिकच आक्रमक झाले असल्याचे दिसून येते.
राऊत यांनी शिंदे गटावर आनंद दिघे यांच्या निष्ठेशी प्रतारणा केल्याचा आरोप केला. आनंद दिघे या निष्ठावान शिवसैनिकाच्या विचाराला तडा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिला, असे राऊत म्हणाले. त्यांनी शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांना भांगेची रोपटं असे संबोधत, आनंद दिघे यांचा अपमान याच लोकांनी केला असल्याचे नमूद केले.
राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुरावे देऊनही आयोग ऐकायला तयार नाहीये, त्यामुळे रस्त्यावर उतरून दणका द्यावाच लागेल, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांना सत्ता आणि पोलिसांच्या संरक्षणाशिवाय मैदानात येऊन फेअर लढाई करण्याचे आवाहन राऊत यांनी केले आहे. सत्तेतून एक दिवस राजीनामा द्या आणि बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

