नगर पंचायत निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच पक्षांच्या अनेक दिग्गजांना धक्का बासला. अनेक मंत्री, आमदार, खासदारांचे पॅनल आणि त्यांचे उमेदवार आपल्या मतदारसंघातील नगर पंचायतीत पराभूत झाले. नाशिक जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या दिग्गजांना हादरा बसलाय. कृषीमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्यासाठी नगर पंचायतीचा निकाल धक्का देणारा ठरलाय. नाशिकमध्ये एकूण 6 नगर पंचायतींमध्ये मतदारांना सर्वांना समान संधी दिली आहे.
जळगावातील बोधवडचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह काँग्रेससाठीही मोठा धक्का समजला जातोय. याठिकाणी काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. तर 17 पैकी 9 जागा जिंकत शिवसेनेनं सत्ता मिळवली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. पण या ठिकाणी शिवसेनेनं 13 जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीला फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.