ठाकरे गटाच्या नेत्यांचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तीव्र संघर्ष, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोल्हापूरजवळ ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलिसांनी रोखले. कर्नाटक पोलिसांच्या कारवाईपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या अडवणुकीमुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठी भाषिकांच्या पाठीशी न उभे राहिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांवर टीका केली.
कोल्हापूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दूधगंगा पुलाजवळ महाराष्ट्र पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना रोखले. कर्नाटक पोलिसांनी अडवण्यापूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी ही कारवाई केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कर्नाटक सरकारची दडपशाही अपेक्षित होती, पण मराठी माणसाला मराठी पोलिसांकडूनच अडवले जाणे हे धक्कादायक आहे असे म्हणत शिवसैनिकांनी ( ठाकरे गट) महाराष्ट्र सरकार आणि गृहखात्यावर मराठी भाषिकांच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप केला. “मराठी मतांसाठी महाराष्ट्रात लोटांगण घालता, पण मराठी बांधवांवर अन्याय होत असताना आमची भूमिका मांडायला का अडवता?” असा सवाल त्यांनी केला.

