उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा असणार आहे,काय म्हणाले उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीने उद्या शनिवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे, या संदर्भात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी बंदमध्ये आपले पक्ष आणि आपला धर्म विसरुन आपल्या मुलींच्या भविष्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
हा बंद विकृती विरुद्ध संस्कृती असा असणार आहे.हा बंद राजकीय कारणासाठी नाही. पालकांच्या मनात आपल्या मुली सुरक्षित आहेत काय असा संशय निर्माण झाला आहे. कायदा ज्यांच्या हातात आहेत तेच जर संरक्षण करण्यासाठी असमर्थ असतील तर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी हा बंद असल्याचे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. हा विकृत नराधमांविरोधात असून महाराष्ट्राची जनता एकत्र आलेली आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल कुठल्या पक्षाचे असाल तरी या बंदमध्ये सहाभागी व्हा. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानदारांनी आपल्या मुलींच्या, बहिणीच्या सुरक्षेसाठी या बंदमध्ये दुकाने बंद ठेवावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.दुपारी 2 वाजेपर्यंत हा बंद चालणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

