Drought Resistant Wheat: दुष्काळातही बंपर उत्पादन, गव्हाचे हे वाण शेतकर्यांसाठी वरदान
Drought Resistant Wheat: दुष्काळातही गव्हाच्या या जातींमुळे शेतकऱ्यांना मालामाल होण्याची संधी आहे. कमी पाणी आणि तीव्र उन्हातही भरघोस पिकाची हमी आणि बंपर उत्पादन मिळत असल्याने या गव्हाच्या जातीकडे शेतकरी वर्ग वळला आहे.

Drought Resistant Wheat: देशात गव्हाची शेती उत्पन्नाचे एक मोठे साधन आहे. अनेक राज्यात रब्बीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करण्यात येते. पण यंदा अल निनोचे संकट आणि पावसाने पाठ फिरवल्याने खरीपावर मोठे संकट आले आहे. तर हिवाळ्यातही उष्णतेमुळे गव्हाच्या दाण्यांच्या वाढीवर परिणाम होण्याची आणि उत्पन्न घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने रब्बीत कोणत्या गव्हाची पेरणी करावी यावरून शेतकरी संभ्रमात आहे. त्यांच्यासाठी गव्हाच्या या जाती वरदान ठरणार आहेत.
शेतकऱ्यांनी अशा वातावरणाशी सुसंगत गव्हाच्या जातींची निवड करणे आवश्यक आहे. उच्च तापमान आणि पाण्याचा तुटवडा अशी परिस्थिती सहन करू शकतील अशा जाती यंदा उपयोगी ठरतील. भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) आणि इतर कृषी संस्थांनी अशा अनेक सुधारित जाती विकसीत केल्या आहेत. या जातीत उष्णता आणि दुष्काळ सहन करण्याची क्षमता आहे. कोणत्या आहेत त्या गव्हाच्या जाती?
DBW 327 हा चांगला पर्याय
गव्हाच्या सुधारीत जातीत DBW 327 वा करण शिवानी अग्रेसर आहे. कर्नाल येथील भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेने (IIWBR) ही जात विकसीत केली आहे. ही जात तीव्र उष्णता आणि दुष्काळ या दोन्ही प्रकारचा ताण सहन करू शकते. ही जात उत्तर आणि मध्यम भारतातील उष्ण प्रदेशात चांगलं उत्पादन देऊ शकते. मैदानी प्रदेशात ही जात सरासरी 79.4 क्विंटल प्रति हेक्टर तर इतर भागात 69.6 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न देते. या गव्हाचा दाणाही टपोरा असतो.
DBW 187 हा पण चांगला पर्याय
दुष्काळी पट्ट्यात DBW 187 हा सुद्धा चांगला पर्याय मानल्या जातो. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2021-22 मध्ये या जातीने लोकप्रिय वाण HD 3086 च्या तुलनेत 3.6 टक्के अधिक उत्पन्न दिले होते. अधिक उष्ण पट्ट्यासाठी गव्हाचे हे वाण चांगले मानले जाते. या जातीसाठी कृषी तज्ज्ञाने केलेल्या शिफारशी, पेरणीची योग्य वेळ आणि सिंचनाची व्यवस्थेची काळजी घेणे आवश्यक आहे.
DBW 222 देणार चांगले उत्पन्न
दुष्काळ आणि शुष्क प्रदेशात DBW 222 हे गव्हाचे वाण चांगले उत्पन्न देईल. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2021-22 या कालावधीत या जातीने HD 3086 च्या तुलनेत 5.4 टक्के अधिक उत्पन्न दिले होते. वाढीव तापमानात आणि कमी पाण्यातही या गव्हाच्या वाणाने दमदार कामगिरी करून दाखवली. सध्या मध्य प्रदेशात या गव्हाची अनेक शेतकरी लागवड करत आहेत.