Surplus Sugarcane : कारखान्यापासून 25 किमी अंतरावरच होता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा ऊस, लाल बावट्याच्या मागण्या काय ?

| Updated on: May 21, 2022 | 2:19 PM

ऊस गाळपाबाबत साखर कारखान्याचे योग्य नियोजन नसल्यानेच अतिरिक्त उसाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. गेवराई तालुक्यातील शेतकरी आत्महत्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या नामदेव जाधव यांनी ऊस फडातच राहिल्याने आत्महत्या केली त्या ऊसाच्या फडापासून साखर कारखाना अवघ्या 25 किलोमीटरवर होता.

Surplus Sugarcane : कारखान्यापासून 25 किमी अंतरावरच होता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा ऊस, लाल बावट्याच्या मागण्या काय ?
Follow us on

बीड : गतआठवड्यात ज्या (Surplus Sugarcane) अतिरिक्त ऊसाच्या धास्तीने गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे ऊसाच्या फडापासून केवळ 25 किमी अंतरावर (Sugar Factory) साखर कारखाना असताना नामदेव जाधव यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले होते. आता या घटेनच्या निषेधार्थ विविध संघटना समोर आल्या आहेत. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळेच अशा घटना घडतात. आता दोन वर्ष उलटले तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा (Crop Insurance) पीक विम्याचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. अशा कारणांमुळे शेतकरी टोकाचा निर्णय घेतो. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन आता लाल बावटा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले.

साखर कारखान्यावर कारवाई गरजेची

ऊस गाळपाबाबत साखर कारखान्याचे योग्य नियोजन नसल्यानेच अतिरिक्त उसाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. गेवराई तालुक्यातील शेतकरी आत्महत्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या नामदेव जाधव यांनी ऊस फडातच राहिल्याने आत्महत्या केली त्या ऊसाच्या फडापासून साखर कारखाना अवघ्या 25 किलोमीटरवर होता. त्यामुळे संबंधित साखर कारखान्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लाल बावटा संघटनेने केली आहे.

पीकविम्याचाही प्रश्न रखडला

बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा गेल्या दोन वर्षापासून पीकविमा रक्कम रखडली आहे. विमा कंपन्यांचा कारभार हा केंद्र सरकारच्या माध्यमातून चालतो मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकार तत्पर नसल्याचेच समोर येत आहे. सन 2020-21 मधील पीकविमा अद्यापही विमा कंपन्यांकडेच आहे. यासंबंधी अनेक वेळा आंदोलन करुनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही. यामुळेच सरकारबद्दल शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोन संघटना एकत्र

बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊस आणि रखडलेला पीकविमा या दोन समस्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या डोकेदुखीच्या ठरत आहेत. यावर योग्य तो तोडगाच निघत नाहीत त्यामुळे पुन्हा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान सभा आणि लाल बावटा आक्रमक झालेत. बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर शेतकऱ्यांचे ठिया आंदोलन सुरू आहे. मराठवाड्यात जालना पाठोपाठ बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही बाबींवर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.