Thane : पहिला पेरा वाया, आता दुबार पेरणीचे संकट, काय आहे कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला..!

| Updated on: Jun 20, 2022 | 9:28 AM

पेरणीनंतर गायब झालेला पाऊस अद्यापही परतलेलाच नाही. शिवाय खरीप हंगामातील पिके ही केवळ पावसावर अवलंबून असतात. असे असतानाही एकही मोठा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे शहापूर, मुरबाड, कल्याण, कसारा या भागातील पिकांची उगवणच झाली नाही तर काही ठिकाणी बियाणे किड्यांनी फस्त केले आहे. त्यामुळे आता दुबार पेरणी केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच नाही.

Thane : पहिला पेरा वाया, आता दुबार पेरणीचे संकट, काय आहे कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला..!
बियाणे
Follow us on

ठाणे : यंदा हवामान विभागाने असा काय अंदाज वर्तवला की त्यामुळे संपूर्ण (Kharif Season) खरीप हंगामात सर्वकाही अलबेल असेल असेच वातावरण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनीही कोणती चिंता न करता अपेक्षित पाऊस पडण्यापूर्वीच चाढ्यावर मूठ धरली पण आता पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार (Sowing Crop) पेरणीचे संकट ओढावले आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवला तरी (Agricultural Department) कृषी विभागाने मात्र सावध पवित्रा घेतला होता. 75 मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीचा श्रीगणेशा करुच नये असे आवाहन वेळोवेळी केले होते. पण उत्पादन वाढ आणि पाऊस पडल्यावर पीक जोमात या आशेपाोटी जूनच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पेरण्या झाल्या आहेत.

पावसाची हुलकावणी, बी-बियाणांची नासाडी

पेरणीनंतर गायब झालेला पाऊस अद्यापही परतलेलाच नाही. शिवाय खरीप हंगामातील पिके ही केवळ पावसावर अवलंबून असतात. असे असतानाही एकही मोठा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे शहापूर, मुरबाड, कल्याण, कसारा या भागातील पिकांची उगवणच झाली नाही तर काही ठिकाणी बियाणे किड्यांनी फस्त केले आहे. त्यामुळे आता दुबार पेरणी केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच नाही. एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे बी-बियाणांचे व खताचे वाढलेले दर हे शेतकऱ्यांसाठी दुहेरी अडचण झाली आहे. त्यामुळे पहिले पेरा देवालाच असे म्हणण्याची वेळ आली आहे.

नेमकी काय आहे सध्याची परस्थिती?

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पावसाचा विचार न करता पेरणीचे मुहूर्त साधले आहे. 15 दिवसांपूर्वीच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे ज्या शेतशिवारात आतापर्यंत पिकाची उगवण होऊन पीक बहरणे अपेक्षित होते तेथील शेतकरी चिंतेत आहेत ते उगवणीबाबत. सध्या जमिनीतील ओलावा हा कमी झालाय. तर पाऊस पडल्याशिवाय हे संकट दूर होणार नाही. शेतकऱ्यांनी हातउसणे पैसे घेऊन चाढ्यावर मूठ ठेवली खरी पण ती आता चिंतेची ठरत आहे. त्यामुळे वाढत्या परिश्रमाबरोबर आर्थिक संकट ओढावले आहे.

हे सुद्धा वाचा

रायगड जिल्ह्यात मात्र मशागतीच्या कामांना वेग

दडी मारलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात वापसी केली आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील महाड, माणगाव, रोहे, मरुडमध्ये मशागतीच्या कामांना वेग आला आहे. पावसामध्ये सातत्य राहिले तर शेतकऱ्यांचा निर्णय योग्यच ठरणार आहे. असे असले तरी उर्वरित शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करुच नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.