काय सांगता ? ओमिक्रॉन विषाणूचा परिणाम सोयाबीनच्या दरावर, शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी?

| Updated on: Nov 30, 2021 | 2:12 PM

दोन दिवसांपासून बाजारातले चित्र काही वेगळेच आहे. कारण दोन दिवसांमध्ये 400 रुपयांनी सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे हे दर घसरले असल्याचा दावा व्यापारी करीत आहेत.

काय सांगता ? ओमिक्रॉन विषाणूचा परिणाम सोयाबीनच्या दरावर, शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ होत किंवा ते स्थिर राहत होते. पण दोन दिवसांपासून बाजारातले चित्र काही वेगळेच आहे. कारण दोन दिवसांमध्ये 400 रुपयांनी सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे हे दर घसरले असल्याचा दावा व्यापारी करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवर होत अललेल्या बदलाचा परिणाम थेट बाजार समितीमधील सोयाबीनच्या दरावर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.

दिवाळीनंतर एकदाही सोयाबीनच्या दरात घट झाली नव्हती. एकतर दरात वाढ किंवा स्थिरता हे दोनच प्रकार होत होते. पण या आठवड्याची सुरवात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी झाली आहे. त्यामुळे आता तरी सोयाबीनची आवक वाढणार का हे पहावे लागणार आहे.

दर घटण्यामागे अनेक कारणे

सोयाबीनचे दर हे वाढत होते तर आवक ही मर्यादितच होती. मात्र, सोमवारपासून चित्र बदलू लागले आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये तब्बल 400 रुपयांनी दर हे घसरलेले आहेत. यामध्ये सोयापेंडची घटती मागणी, कोमोडिटी बाजारात झालेली घसरण आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातावर येत असलेली बंधने ही कारणे समोर येत आहेत. कारणे कोणतीही असो आता शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय आहे. एका महिन्यात दीड हजाराने सोयाबीनचे भाव वाढले तर दोन दिवसांमध्ये 400 रुपयांनी घसरलेले आहेत.

शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

यंदाच्या हंगामात सोयाबीन दराचा परिणाम आवकवर केव्हाच झाला नव्हता. दर वाढले तरी आवक ही कमीच होती आणि दर कमी झाले तरी आवक ही वाढलेली नव्हती. सोयाबीनच्या वाढीव दराबाबत शेतकऱ्यांना विश्वास होता. त्यानुसार दर वाढलेही. मात्र, सोयाबीनला 10 हजाराचा दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पण ते प्रत्यक्षात होईल का नाही याबाबत सांगता येत नाही. पण अधिकच्या अपेक्षेत आहे ते हातून जायचे एवढे लक्षात ठेऊन सोयाबीनची विक्री करणे आवश्यक आहे. अन्यथा नुकसानही होऊ शकते असा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.

तरीही आवक कमीच

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर वेळी सोयाबीनची आवक ही 10 ते 15 हजार पोत्यांची असते तर हंगाम सुरु झाला की ही आवक 40 ते 60 हजार पोत्यांवर जाते. यंदा मात्र, एकदाही सरासरी एवढी आवक झालेली नाही. शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला होता. दरवाढीने त्यांचा उद्देशही साध्य झाला आहे. मात्र, आता अधिकची अपेक्षा केली तर काय सांगता येत नाही. कारण सोयाबीन बाबत यंदा सर्वकाही अनपेक्षितच घड़त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

वीजबिले अंदाजेच : वापर कमी अन् बिले अवास्तव, काय आहे बांधावरचे वास्तव?

Video | भररस्त्यात रेड्यांची टक्कर ! मग काय बघ्यांची गर्दी अन् वाहतूकीचे तीन तेरा

खरीप-रब्बी बेभरवश्याचीच, आता शाश्वत शेतीसाठी ‘हाच’ शेतकऱ्यांकडे पर्याय…!