
मुंबई : सध्या कार खरेदी करणे खूप सोपे झाले आहे. जर काही कारणास्तव तुम्ही नवीन कारसाठी पूर्ण बजेट व्यवस्था करू शकत नसाल, तर तुम्ही कर्ज घेऊन देखील कार खरेदी करू शकता. कंपन्यांनी कार लोनची प्रक्रियाही अगदी सोपी केली आहे. अगदी एक दोन दिवसातही कार लोन मंजूर करणाऱ्या कंपण्या आहेत. मात्र ईएमआयच्या ओझ्यामुळे अनेकजण कार घेण्यासाठी थबकतात. त्यामुळे तुम्हीही लोनवर कार (Car Loan) घेण्याचा विचार करत असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवणे फायद्याचे ठरेल. तुम्हाला एक चांगली डील तर मिळेलच, पण तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेडही सहज करू शकाल.
कार खरेदी करताना तुमचे बजेट लक्षात ठेवा आणि तुमचा खर्चाची ताकद पाहूनच वाहन निवडा. यासह, तुम्हाला कार कर्ज देखील सहज मिळेल आणि कोणत्याही त्रासाशिवाय ईएमआय भरण्यास सक्षम व्हाल. EMI तुमच्या पगाराच्या 10 टक्कयांपेक्षा जास्त नसेल तर आर्थिक ओढाताण हेणार नाही.
तुमच्या कर्जाचा कालावधी हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. कमाल 4 वर्षांचे कार कर्ज योग्य मानले जाते. 4 वर्षे हा वाहनासाठी फार मोठा काळ नसतो आणि यामुळे तुम्हाला दरमहा EMI वर बचत करता येते.
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याच्या निकषात बसता की नाही हे जाणून घ्या. काही बँका तुमचा क्रेडिट स्कोअर देखील पाहतात, त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे सोपे जाईल. तुम्ही बँकांच्या ऑफर जसे की व्याज दर, प्रक्रिया शुल्क आणि इतर अटी देखील तपासू शकता. जर तुम्हाला बँकेकडून चांगली ऑफर मिळाली तर तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड सहज करू शकता.