Honda Elevate : होंडाची नवी कोरी एलिवेट भारतात सादर, क्रेटा आणि सेल्टॉस एसयुव्हीचे धाबे दणाणले!

| Updated on: Jun 06, 2023 | 2:22 PM

होंडा कंपनीने सिटी आणि एमेजनंतर भारतात तिसरी गाडी लाँच केली आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीने एलिवेट गाडी तयार केली आहे. या गाडीची बुकिंग पुढच्या महिन्यापासून करता येईल.

Honda Elevate : होंडाची नवी कोरी एलिवेट भारतात सादर, क्रेटा आणि सेल्टॉस एसयुव्हीचे धाबे दणाणले!
Honda Elevate : भारतात होंडाची एलिवेट गाडीची पुढच्या महिन्यापासून बुकिंग सुरु, जाणून घ्या काय आहे खासियत
Image Credit source: Honda
Follow us on

मुंबई : होंडा कंपनीने आपल्या 75 वर्धापनदिनानिमित्त होंडा एलिवेट (Honda Elevate) ही गाडी सादर केली आहे. या गाडीसह कंपनीच्या ताफ्यात आता नवी मिड साईज एसयुव्ही भर पडली आहे. कंपनीने ऑल न्यू होंडा एलिवेट गाडीचं भारतातच वर्ल्ड प्रीमियर केलं आहे. होंडा सिटी आणि एमेजनंतर जापानी कार निर्मात कंपनीचं हे तिसरं प्रोडक्ट आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कंपनीने ही गाडी तयार केली आहे. ही गाडी पहिली मिड साईज एसयुव्ही असून यात R-V बॅज नसेल. कंपनीने सहा वर्षानंतर नवी गाडी सादर केली आहे. या गाडीमध्ये जबरदस्त फीचर्स दिले असून गाडी आकर्षक आहे. ही गाडी दोन रंगांमध्ये उपलब्ध असून ग्राहकांना या गाडीची बुकिंग पुढच्या महिन्यापासून करता येणार आहे.

होंडा एलिवेट एसयुव्हीमध्ये चांगली स्पेस आहे. मिड साईज एसयुव्ही असली तरी यात फुल साईज एसयुव्हीसारखे फीचर्स दिले गेले आहेत. एसयुव्हीमध्ये 1.5 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन दिलं गेलं आहे. होंडाने पॉवर ट्रान्समिशनसाठी सही स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि अॅडव्हान्स सीव्हिटी ऑप्शन दिले आहेत. होंडाची नवीन कार आरडीई, बीएस 6 फेस 2 आणि ई20 ला सपोर्ट करते.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही गाडी जबरदस्त आहे. यात अपेक्षित सिक्युरिटी फीचर्स दिले गेले आहेत. या कारमध्ये सहा एअरबॅग्स दिल्या आहेत. SOFIX चाइल्ड सीट माउंटसारखं सेफ्टी फिचरही आहे. रडार बेस्ड अॅडव्हान्स असिस्टेंस सिस्टम तंत्रज्ञानाच्या माध्यामातून ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग, अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन कीप असिस्ट आणि हाय बीम असिस्टसारख्या सुविधा आहेत. कारमध्ये हिल होल्ड असिस्ट, रियर पार्किंग सेंसर, रियर सीटबेल्ट रिमाईंडर यासारखे फीचर्स आहेत.

या गाडीत डोअर पॅनेल माउंटेड ओआरव्हीएम, एलईडी हेडलाईट्स, रुफलाईन्स, कनेक्टेड एलईडी लाईट्ससारखे फीचर्स दिले आहेत. इंटिरियरमध्ये इलेक्ट्रिस सनरूफ, 10.25 इंचाचा टचस्क्रिन सिस्टम, वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले, 7 इंचाचा सेमी डिजिटर इंस्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग पॅड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीटसारखे फीचर्स दिले आहेत.

या गाडीची लांबी 4312 मीमी असून रुंदी 1790 मीमी आहे. तसेच उंची 1650 मीमी इतकी आहे. यामुळे गाडीतून प्रवास करणं एकदम आरामदायी असेल असा दावा कंपनीने केला आहे. ही गाडी ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन टायगुन आणि एमजी एस्टरशी स्पर्धा करेल.

कंपनीने या गाडीची बुकिंग पुढच्या महिन्यापासून सुरु होईल याची घोषणा केली आहे. तुम्ही ही गाडी जुलै महिन्यात बूक करू शकता. पण या गाडीच्या किमतीबाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. फेस्टिव्ह सिझन दरम्यान होंडा एलिवेट लाँच होईल आणि त्याची किंमत समोर येईल.