आता ईलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी रिसायकल होणार, MG Motor ची पर्यावरणस्नेही मोहीम

| Updated on: Dec 25, 2021 | 6:30 AM

एमजी मोटर इंडियाने अट्टेरो (Attero) च्या सहयोगाने भारतामध्ये एक चक्रीय आणि शाश्वत ईव्ही अर्थव्यवस्था निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी एमजीच्या पहिल्या ईव्ही बॅटरीवर यशस्वीपणे पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) केली आहे.

आता ईलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी रिसायकल होणार, MG Motor ची पर्यावरणस्नेही मोहीम
Mg Zs Ev
Follow us on

मुंबई : एमजी मोटर इंडियाने अट्टेरो (Attero) च्या सहयोगाने भारतामध्ये एक चक्रीय आणि शाश्वत ईव्ही अर्थव्यवस्था निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी एमजीच्या पहिल्या ईव्ही बॅटरीवर यशस्वीपणे पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) केली आहे व या रिसायकलिंग प्रक्रियेमधून मिळालेल्या धातू आणि इतर अनेक पदार्थांचा नवीन बॅटरी तयार करण्यामध्ये वापर करता येणार आहे. (MG Motor collaborates with Attero Recycling, to recycle its battery for ZS EV)

या लक्षणीय यशाबरोबरच एमजी मोटर इंडियाने ईव्ही परिसंस्थेला अधिक बळकटी देत मुख्यत्वे या प्रक्रियेला अधिक हरित आणि शाश्वत बनविण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणखी व्यापक पातळीवर नेले आहे. एमजीने उचललेले हे पाऊल म्हणजे लोकांना आपल्या आयुष्यात आणि भोवतीच्या जगामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या कंपनीच्या #चेंजव्हॉटयुकॅन’ मोहिमेशी मेळ साधणारे आहे. एमजी मोटर इंडियाने भारताची पहिली संपूर्णपणे इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही – झेडएस ईव्‍हीच्या लि-आयन बॅटरीजचा पुनर्वापर आणि पुननिर्माण करण्यासाठी अट्टेरोशी सहयोग साधला आहे.

एमजी मोटर इंडियाचे प्रेसीडंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजीव छाबा म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहनांच्या संपूर्ण शाश्वततेची काळजी घेणे याचा एमजीमधील आम्हा सर्वांना ध्यास आहे. वापरलेल्या बॅटरींमुळे होणारा कचरा हे शाश्वत वाहतुकीच्या मार्गातील मोठे आव्हान असल्याने बॅटऱ्यांचे रिसायकलिंग करणे म्हणजे ही दरी सांधण्याचा एक इष्टतम पर्याय आहे. या क्षेत्रावर क्रांतीकारी परिणाम घडवून आणण्यासाठी शाश्वत उपाययोजना निर्माण करण्यासाठी भविष्यात या आघाडीवर अधिक प्रयत्न करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

ई-कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष

अट्टेरो रिसायकलिंगचे सीईओ आणि को-फाउंडर नितीन गुप्ता म्हणाले, “ईव्ही वाहनांच्या क्षेत्रामध्ये उतरणाऱ्या कंपन्या अधिक वेगाने प्रगती करत असताना भारतामध्ये ई-कचरा व्यवस्थापनाकडे शाश्वत दृष्टिकोनातून पाहणे अधिकाधिक महत्त्वाचे होत चालले आहे. आपल्या देशाला एकरेषीय अर्थव्यवस्थेकडून चक्रीय अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यास मदत करण्यासाठीची गुरुकिल्लीही यातच दडलेली आहे.”

धातूंच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर बनविण्याचे ध्येय

गुप्ता म्हणाले की, “लिथियम-इयॉन बॅटरीमधील एकूण धातूपैकी जवळ-जवळ 90 टक्‍के धातू वेगळा काढण्यासाठीचे तंत्रज्ञान आमच्याजवळ आहे आणि या प्रक्रियांतून तांबे, लिथियम आणि कोबाल्टसारख्या मौल्यवान धातूंच्या बाबतीत भारताला आत्मनिर्भर बनविण्याचे ध्येय आमच्यासमोर आहे. या कामी एमजी मोटर्सशी हातमिळवणी केल्याचा आम्हाला आनंद आहे. आमची ही भागीदारी ईव्ही परिसंस्थेला अधिक बळकट करण्याच्या आणि या संपूर्ण उद्योगक्षेत्रासाठी एक आदर्श उदाहरण घालून देण्याच्या कामी सक्रिय भूमिका बजावेल.”

इतर बातम्या

Hero Moto Corp : जानेवारीपासून महाग होणार ‘हिरों’सह विविध गाड्या, इथे पाहा मॉडेल्स आणि किंमती

Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…

Motorcycles India : TVS मोटरनं लाँच केली अपाची आरटीआर 165 RP लिमिटेड एडिशन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

(MG Motor collaborates with Attero Recycling, to recycle its battery for ZS EV)