Car AirBag : जीव वाचवण्यासाठी असलेल्या एअरबॅगनेच कारमध्ये 25 वर्षीय मुलाचा जीव घेतला, मीरा-भाईंदरमधली धक्कादायक घटना

Car AirBag : एअरबॅग ही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दिली जाते. अपघाताच्यावेळी जिवीतहानी होऊ नये, जीव वाचावेत यासाठी एअरबॅग दिलेली असते. पण मिरा-भाईंदरच्या प्लेजंट पार्क परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एअरबॅगमुळे एका युवकाचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

Car AirBag :  जीव वाचवण्यासाठी असलेल्या एअरबॅगनेच कारमध्ये 25 वर्षीय मुलाचा जीव घेतला,  मीरा-भाईंदरमधली धक्कादायक घटना
Mira Bhayandar plesent Park Area
| Updated on: Jun 27, 2026 | 10:24 AM

कुठल्याही कारमध्ये एअरबॅग ही सुरक्षिततेसाठी दिलेली असते. कारचालकासह कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एअरबॅग दिली जाते. अपघाताच्यावेळी जिवीतहानी होऊ नये, प्रवाशांचे जीव वाचावेत यासाठी एअरबॅग दिलेली असते. साध्यात साध्या कारपासून ते आलिशान, महागड्या प्रत्येक कारमध्ये एअरबॅग असते. फक्त वाहनानुसार एअरबॅगची संख्या कमी-जास्त असू शकते. आता मिरा-भाईंदरच्या प्लेजंट पार्क परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जी एअरबॅग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असते, ती अचानक उघडल्यामुळे एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव मोहित सोनी (२५) असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गाडी चालवताना गाडीतील एअरबॅग अनपेक्षितपणे उघडली. या घटनेत मोहित सोनी यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी टेंबा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

एअरबॅग नेमकी कशामुळे उघडली?

मोहित सोनी यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय? गाडीतील एअरबॅग नेमकी कशामुळे उघडली? या घटनेला अन्य कोणती तांत्रिक कारणे आहेत का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय अहवाल, तांत्रिक तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी करण्यात येत असून, अधिक तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे. आठ सीट असलेल्या चारचाकी गाड्यांसाठी 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

कारमध्ये एअरबॅग कुठे असतात?

सध्याच्या काळात सर्व कंपन्यांना कारमध्ये एअर बॅग देणं बंधनकारक आहे. कार कंपन्यांनी कारमध्ये कमीत कमी 2 एअरबॅग देणे आवश्यक आहे. पण कारमध्ये एअरबॅग कुठे दिल्या जातात त्या बद्दल माहिती जाणून घ्या.

कारच्या स्टेअरिंगसोबतच प्रवाशांसमोर डॅशबोर्डवर एअरबॅग असते.काही कार कंपन्यांनी गुडघ्याच्या संरक्षणासाठी खालच्या भागातही एअरबॅग दिल्या आहेत.

कारच्या आत साइड एअरबॅगही देण्यात ये्तात, ज्याला साइड कर्टन एअरबॅग्स म्हणतात. खरं तर या एअरबॅग खिडक्यांच्या वर किंवा आजूबाजूला दिल्या जातात.

Follow Us