
मुंबई : गेल्या काही वर्षात देशात गाड्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलं आहे. देशात अपघातांची संख्या पाहता केंद्र सरकारकडून कठोर नियमावली करण्यात आली आहे. अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी कंपन्या आपल्या गाड्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फीचर्स देत आहेत.नवी गाडी विकत घेताना कारच्या सुरक्षेबाबत हल्ली विचार केला जात आहे. प्रत्येकाला वाटत असतंकी आपण घेत असलेल्या गाडीमध्ये लेटेस्ट सेफ्टी फीचर्स असावेत. त्या दृष्टीने कंपन्या आपल्या गाड्यांमध्ये एअरबॅग्सची संख्या वाढण्यासोबत ADAS तंत्रज्ञानही देत आहे.त्यामुळे चालकांना सुरक्षेची हमी मिळते. पण ADAS तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं ते जाणून घेऊयात
अॅडवान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) असा याचं पूर्ण नाव आहे. म्हणजेच ड्रायव्हरला मदत करणारी प्रणाली. या प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक उपकरणांचा वापर केला जातो. जसं की कॅमेरा, सेन्सर आणि रडारचा उपयोग होतो. अनेकदा गाडी चालवताना आपलं दुर्लक्ष होतं आणि अपघातात मोठी किंमत मोजावी लागते. पण या तंत्रज्ञानानुसार गाडी तुम्हाला वारंवार सुचना देते. त्यामुळे अपघाताची शक्यता कमी होते. अॅडवान्स ड्रायव्हिंग असिस्टेंट सिस्टम तंत्रज्ञान पाच लेव्हलसह येते.
ADAS चे लेव्हल कारच्या ऑटोमेशन लेव्हलवर आधारित असतात. यात 0 ते 5 पर्यंत मुल्यांकन केलं जातं. कारमध्ये कोणतंच तंत्रज्ञान नसेल तर शून्य लेव्हल. पण काही फंक्शन कंट्रोल करत असेल तर लेव्हल 2 गणली जाते. अशा पद्धतीने 5 व्या लेव्हलपर्यंत मुल्यांकन केलं जातं. 5 गुण म्हणजेच सेल्फ ड्रायव्हिंग मोड असून गाडी स्वत:हून चालण्यास सक्षम असते.
ADAS फीचर्स असलेल्या गाड्यांमध्ये ट्रॅफिक साइन रिकग्निशन, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जेंसी ब्रेकिंग, ब्लाइंट स्पॉट डिटेक्शन, पेडेस्ट्रियन डिटेक्शन, ऑटोमॅटिक पार्किंग, ऑटोनोमस वॅलेट पार्किंग, नेविगेशन सिस्टम, अडेप्टिव क्रुझ कंट्रोल, अडेप्टिव लाइट कंट्रोल, नाइट विजन, अनसीन एरिया मॉनिटरिंग आणि ड्रायव्हिंग मॉनिटरिंग सिस्टम सारखे फीचर्स मिळतात. भारतात सध्या महिंद्राच्या एक्सयूव्ही 700, एमजी अॅस्टर, एमजी ग्लॉस्टर आणि ह्युंदाई टक्सनमध्ये हे सर्व फीचर्स पाहायला मिळतात.