नाव मोठं लक्षण खोटं! नावाजलेल्या 16 कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांचे देव पाण्यात, कोणते आहेत ते IPO?

| Updated on: Jan 26, 2022 | 8:04 AM

फक्त कंपनीचे नाव बघून आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणुकदार आता हवालदिल झाले आहेत. 16 कंपन्यांचे समभाग इशु प्राईजच्या ही खाली आले आहेत. नाव मोठं आणि लक्षण खोटं असा प्रवास करणा-या 16 कंपन्यांच्या कामगिरीमुळे गुंतवणुकदारांना त्यांचे देव पाण्यात ठेवावे लागले आहे.

नाव मोठं लक्षण खोटं! नावाजलेल्या 16 कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांचे देव पाण्यात, कोणते आहेत ते IPO?
शेअर बाजार
Follow us on

संत चोखाबांनी अनेक दशकांपूर्वी वरवरच्या, अभासी जागाचे गारुड मनावर न बसू देण्याचा सल्ला दिला आहे. त्याचा प्रत्यय शेअरमार्केटमध्ये येत आहे. फक्त कंपनीचे नाव पाहून अनेक गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या आयपीओ (IPO) मध्ये मोठी गुंतवणूक केली. भविष्यात या कंपन्या त्यांच्या नावामुळे अजून जोमदार कामगिरी करतील हा त्यांचा होरा, सपशेल खोटा ठरला नी गुंतवणूकदारांना आता देव पाण्यात ठेवावे लागले आहेत. या कंपन्यांनी मोठा डंका वाजवत गुंतवणूकदारांकडून पैसा जमा केला, मात्र कामगिरीबाबत या कंपन्यांची सहा महिन्यांतच दमछाक दिसून आली. 16 कंपन्यांची कामगिरी सरासरीपेक्षा ही ढेपाळल्याने गुंतवणूकदार (Investors) हवालदिल झाले आहेत. त्यातच शेअर बाजार सध्या हेलकावे खात असल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. त्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या कामगिरीवर होत आहे. दोन वर्षानंतर जानेवारी महिना भारतीय आयपीओ बाजारासाठी (Share Market) सर्वात वाईट ठरला आहे. आयपीओच्या माध्यमातून जेवढी मोठी रक्कम उभी राहिली होती, तेवढी कंपन्यांच्या शेअर्सची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी बाजारात आलेल्या आयपीओने गुंतवणूकदारांना आकर्षित केले आणि भरपूर पैसाही उभा केला. बाजारात लिस्टिंग करताना त्यांच्या किमतीही झपाट्याने वाढल्या, पण जानेवारीत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे जवळपास 38 टक्के आयपीओंनी पदार्पणातच गुडघे टेकले. 16 कंपन्यांत गुंतवणूक करणा-यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

या कंपन्यांची पडझड

ब्लूमबर्गच्या मते, 2021 मध्ये 42 कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केले होते. त्यापैकी 38 टक्के म्हणजेच सुमारे 16 कंपन्यांचे समभाग आता त्यांच्या इश्यू प्राइसच्या खाली पोहोचले आहेत. इतकी वाईट परिस्थिती म्हणजे दर 3 पैकी 1 आयपीओ विक्री किंमतीपेक्षा कमी दराने कामगिरी करीत आहे. मार्च 2020 नंतर या महिन्यात भारतीय आयपीओ बाजाराला सर्वाधिक फटका बसला आहे. जानेवारीत बीएसईचा आयपीओ (BSE IPO) निर्देशांक 10 टक्क्यांपर्यंत घसरला. सर्वात मोठी पडझड झालेल्या आयपीओमध्ये झोमॅटो, पेटीएम, नायकासारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे, ज्यावर गुंतवणूकदारांचा जास्त विश्वास होता. आयपीओतून साडेतीन हजार कोटींहून अधिक रक्कम उभारणाऱ्या 46 टक्के कंपन्यांना आता तोटा सहन करावा लागत आहे.

विक्रमी 18 अब्ज डॉलर्स भांडवल जमा

बीएसई आणि एनएसईवरील लिस्टिंगपूर्वी, या कंपन्यांनी त्यांच्या रिटेल आणि अँकर गुंतवणूकदारांकडून 18 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त भांडवल जमा केले होते, हा भारतीय शेअर बाजारातील आतापर्यंतचा विक्रम आहे. सोमवारी झालेल्या दोन महिन्यांच्या सर्वात मोठ्या घसरणीदरम्यान झोमॅटोच्या शेअरमध्ये 20 टक्क्यांची घसरण झाली.त्याचप्रमाणे नायका १३ टक्क्यांनी तर पेटीएममध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली होती. 2021 मध्ये सर्वात मोठा आयपीओ आणणाऱ्या पेटीएमच्या शेअरची किंमत त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा 50 टक्क्यांच्या खाली आली आहे.

संबंधित बातम्या :

आता सरकारी कंपन्यांना करणार सोन्याहून पिवळे,  ‘या’ युक्तीने चमकणार सरकारी कंपन्याचे शेअर्स

शेअर बाजार कोमात, तरिही बिटकॉईन जोमात! कोणकोणत्या कॉईनचा बाजार तेजीत? वाचा

12 दिवसांत केलं मालामाल, कोणत्या शेअरनं केली कमाल? दामदुप्पट कामगिरी करणाऱ्या शेअरची खबरबात