दिवाळीआधी सर्वसामान्यांना मोठा धक्का! AC, TV, फ्रिज महागणार; किमती कितीने वाढणार?

Tv And AC Price Hike: दिवाळीच्या खरेदीपूर्वी सर्वसामान्य माणसाला महागाईचा मोठा धक्का बसणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरण उत्पादक त्यांच्या काही उत्पादनांच्या किमती वाढवणार आहेत.

दिवाळीआधी सर्वसामान्यांना मोठा धक्का!  AC, TV, फ्रिज महागणार; किमती कितीने वाढणार?
| Updated on: Sep 27, 2026 | 3:30 PM

दिवाळीच्या खरेदीपूर्वी महागाईचा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. दिवाळी आणि दसऱ्यासाठी टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन यांसारखी घरगुती उपकरणे खरेदी करू इच्छिणाऱ्यांना महागाईमुळे मोठ्या दरवाढीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या अगदी आधी, एअर कंडिशनर (एसी), स्मार्ट एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांनी किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्ससह अनेक कंपन्यांनी आधीच काही उत्पादनांच्या किमती वाढवल्यात. कच्च्या मालाच्या विक्रमी किमती आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना दर वाढवण्यास भाग पडत आहे. यामुळे आता काही वस्तूंच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपन्यांच्या मते, उत्पादन खर्चात झालेल्या प्रचंड वाढीमुळे त्यांच्याकडे दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही. तांबे, ॲल्युमिनियम, स्टील, प्लॅस्टिक आणि कच्च्या तेलाशी संबंधित घटकांच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याची किंमत गेल्या वर्षीच्या सुमारे ८,०००-९,००० डॉलर प्रति टनावरून वाढून सुमारे १४,५०० डॉलर प्रति टन झाली आहे. एका सरासरी एसीसाठी ३ ते ४ किलोग्रॅम तांबे लागत असल्याने, उत्पादन खर्च थेट वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार आणि वाढत्या मालवाहतूक खर्चामुळे कंपन्यांच्या नफ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. एसीच्या किमती अंदाजे पाच ते आठ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असताना, काही कंपन्या वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि एलईडी टीव्हीच्या किमती तीन ते चार टक्क्यांनी वाढवत आहेत.

तर दुसरीकडे काही कंपन्या अजूनही परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अनेक कंपन्यांना वाटते की, या दरवाढीचा मागणीवर परिणाम होऊ शकतो. तर काहींच्या मते, या दरवाढीचा परिणाम मर्यादित असेल, कारण विक्रेते आणि वितरकांकडे जुन्या किमतीत आधीच मालसाठा उपलब्ध आहे. ब्लू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रॉनिक्ससह अनेक कंपन्यांनी विविध श्रेणींमध्ये दरवाढ जाहीर केली आहे. एलजी आणि हिताची ब्रँडचे एअर कंडिशनर विकणाऱ्या बॉश होम कम्फर्टनेही एसीच्या दरात सुमारे पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. पॅनासोनिक सध्या दरवाढीसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us