
हाँगकाँगमध्ये एशियन व्हेंचर फिलान्थ्रॉपी नेटवर्क (AVPN) शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदानी यांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांनी परोपकाराच्या पारंपारिक व्याख्येला आव्हान देत म्हटले की, दान करण्यापेक्षा जबाबदारी आणि भागीदारी महत्वाची आहे. त्यांच्या भाषणाने केवळ उपस्थितांची मने जिंकली नाहीत तर विकास आणि समाजसेवेच्या ध्येयाला एक नवीन दिशा दिली.
डॉ. अदानी यांनी गुजरातच्या कच्छ मधील एका कथेने आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यांनी म्हटले की, ‘मी एका महिलेला वाळवंटातील ओसाड जमिनीवर बी पेरताना पाहिले होते. मी तिला विचारले की या कोरड्या जमिनीत बी का पेरत आहे? तेव्हा त्या महिलेने उत्तर दिले की, एक दिवस पाऊस नक्कीच येईल. जर जमिनीत बी नसेल तर पाऊसही वाया जाईल. या कथेनंतर डॉ. अदानी म्हणाल्या की अशी विचारसरणी प्रत्यक्षात बदलाचा पाया रचते.
डॉ. प्रीती अदानी यांनी अहमदाबादमध्ये दंतवैद्य म्हणून कारकीर्द सुरू केली होती. कालांतराने त्यांनी पती गौतम अदानी यांच्या राष्ट्र उभारणीच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेत आपले जीवन समाजसेवेसाठी अर्पण केले. प्रीती यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘गौतम अदानी यांना असं वाटतं की, खरा विकास केवळ पायाभूत सुविधा किंवा व्यवसायात लपलेला नाही तर शाळा, रुग्णालये आणि उपजीविकेच्या शाश्वत विकासात आहे. याच विचाराच्या आधारावर 1996 मध्ये अदानी फाउंडेशनची स्थापना झाली.
अदानी फाउंडेशन ही आज भारतातील सर्वात मोठ्या सामाजिक संस्थांपैकी एक आहे. ही संस्था शिक्षण, आरोग्य, पोषण आहर, शाश्वत रोजगार , ग्रामीण पायाभूत सुविधा आणि हवामान बदल या क्षेत्रात काम करत आहे. आतापर्यंत ही संस्था 7000 पेक्षा जास्त गावे आणि 96 लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे. या आकडेवारीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक बदलामागे कथा लपलेली आहे असं अदानी यांनी सांगितले.
डॉ. प्रीती अदानी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाल्या की, बदल केवळ देणग्या देऊन होत नाही. खरा बदल तेव्हाच होजो जेव्हा आपण मदत घेणाऱ्यांपर्यंत पोहोचतो. जर सरकार, व्यवसायिक आणि समाज एकत्र आला तर आपण असे बदल घडवू शकतो ज्यांचा परिणाम अनेक पिढ्यावर होईल. आपल्याला दुष्काळातही बी पेरणारी पिढी बनावे लागेल, कारण तिला पाऊस येईल असा विश्वास आहे. जेव्हा पाऊस येईल तेव्हा इतिहास साक्ष देईल की कोणीतरी आशेचे बीज पेरले होते.