बॉस बनून AIचा फोन, बँक चेअरमनने ट्रान्सफर केले तब्बल 1,034 कोटी; सर्वात मोठ्या बँकेची फसवणूक
AI Scam News: इटलीत AI फ्रॉडचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॉस बनून फोन करत बँक चेअरमनला 1,034 कोटींचा गंडा घालण्यात आला आहे.

एआयने लोकांचे काम सोपे केले असले तरी त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांनाही प्रोत्साहन मिळाले आहे. अलीकडेच एआयचा वापर करून एका मोठ्या बँकेची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी एआयचा वापर करून बँकेला फोन केला आणि बँकेच्या अध्यक्षांना फसवून अंदाजे ९५ दशलक्ष युरो हस्तांतरित करून घेतले. यामुळे आता खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इटलीतील आहे. फसवणूक करणाऱ्यांनी एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मोठ्या इंटेन्सा सॅनपाओलो खाजगी बँकेचे बँकिंग युनिट असलेल्या फिड्यूरमची सुमारे 95 दशलक्ष युरोची फसवणूक केली आहे. या प्रकरणाची सुरुवात फेब्रुवारीमध्ये झाली. त्यावेळी फिड्यूरमचे अध्यक्ष पाओलो मोलेसिनी यांना इंटेन्सा सॅनपाओलोचे सीईओ कार्लो मेसिना यांच्या नावाने एक व्हॉट्सॲप संदेश आला.
त्या संदेशात परदेशातील एका महत्त्वाच्या व्यवहारासाठी मदतीची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी एका मोठ्या लॉ फर्ममधील वरिष्ठ वकील असल्याचे भासवून फोन केला. व्यवहाराची पुष्टी केली. फसवणूक करणाऱ्यांनी वकिलाच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला. संदेश आणि फोन कॉल्स खरे आहेत असे समजून मोलेसिनीने बँकेच्या वित्त विभागाला परदेशी बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले.
त्यापैकी बहुतेक पैसे चीन आणि हाँगकाँगमधील खात्यांमध्ये पाठवण्यात आले. फसवणूक झालेल्या निधीपैकी अंदाजे ५३ दशलक्ष युरो वसूल करण्यात आले असले तरी अंदाजे ३६ दशलक्ष युरो अद्याप हिशोबात आलेले नाहीत. फिडेरमच्या लक्षात आले की, या निधीच्या हस्तांतरणात अनियमितता आहे. बँकेने तात्काळ इतर देशांतील बँका आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. चीन, पोर्तुगाल आणि इटलीमधील संस्थांच्या सहकार्याने अंदाजे ५३ दशलक्ष युरो वसूल करण्यात आले.
उर्वरित रक्कम विविध परदेशी बँक खात्यांमार्फत हस्तांतरित करण्यात आली. क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करण्यात आली. त्यामुळे तिचा माग काढता आलेला नाही. पाओलो मोलेसिनी किंवा फिड्यूरमच्या इतर कोणत्याही कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध कोणताही तपास सुरू नाही. मिलानच्या अभियोक्त्यांनी युरोपबाहेर राहणाऱ्या एका परदेशी नागरिकाविरुद्ध संगणक फसवणुकीच्या संशयावरून तपास सुरू केला आहे. मोलेसिनी यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला देत मार्चमध्ये फिड्यूरमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
