मंदी सदृश्य स्थितीत महाराष्ट्रासाठी चांगली बातमी, एका मोठ्या कंपनीच्या गुंतवणूकीमुळे मुंबई क्षेत्रात नोकरीची मोठी संधी
Maharashtra Invesment : आयटी क्षेत्राला AI चा फटका बसताना दिसतोय. बऱ्याच ठिकाणी नोकरभरती बंद आहे. कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येत आहे. अशा स्थितीत आता महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी आहे.

अमेरिका-इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्थिती बिघडली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजची दोन्ही देशांनी कोंडी करुन ठेवली आहे. जगातील एक महत्वाच्या जलमार्गावरुन वाहतूक जवळपास ठप्प आहे. जगाची 20 टक्के तेल वाहतूक स्ट्रेट ऑफ हॉर्मजुमधून होते. तेल सहज मिळत नसल्याने तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. इराणने आखाती देशातील काही तेल प्रकल्पांवर हल्ले केले. त्यामुळे तेल उत्पादनात घट झाली आहे. परिणामी तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भारत जवळपास 85 ते 90 टक्के तेल आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे डॉलर समोर रोज रुपया घसरतोय. परिणामी अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत चालला असून एक मंदी सदृश्य स्थिती तयार होत चालली आहे. त्यात AI मुळे अनेक ठिकाणी कर्मचारी कपात झाल्याच्या बातम्या येत आहेत.
AI मुळे कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आल्याच्या बातम्यात येत आहेत. यात जगातील मोठ मोठ्या कंपन्या आहेत. खासकरुन आयटी क्षेत्राला AI चा फटका बसताना दिसतोय. बऱ्याच ठिकाणी नोकरभरती बंद आहे. कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येत आहे. अशा स्थितीत आता महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्रात एक मोठी गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात जवळपास 3000 नोकऱ्यांची निर्मिती होईल. यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आहेत.
किती लाख कोटीची गुंतवणूक होणार?
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ‘एएम इंटेलिजन्स लॅब्स’ कंपनी महाराष्ट्रात 1 लाख 14 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नुकताच सामंजस्य करार झाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘एएम इंटेलिजन्स लॅब्स’ कंपनीसोबत मुंबई, दिल्लीत बैठका घेऊन पाठपुरावा केला. त्याला मोठं यश येताना दिसतय.
‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’
या करारानुसार एमएमआर म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रात 500 MW क्षमतेचा ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ व डेटा सेंटर पार्क उभारलं जाणार आहे. या गुंतवणुकीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात आयटी सेवेतील 3000 हायटेक नोकऱ्या उपलब्ध होतील.