
Apollo Tyres Share : भारतीय क्रिकेट संघाला नवीन प्रायोजक मिळाला आहे. ड्रीम 11 (Fantasy Sports App Dream11) स्पॉन्सरशिप संपल्यानंतर नवीन प्रायोजक कोण याची चर्चा रंगली होती. मंगळवारी BCCI ने अपोलो टायर्ससोबत (Apollo Tyers) करार केला. अपोलो कंपनी टीम इंडियाची नवीन प्रायोजक ठरली आहे. आता टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्स कंपनीचा लोगो दिसेल. या घडामोडीचा शेअर बाजारातही परिणाम दिसून आला. कंपनीच्या शेअरमध्ये चांगली उसळी दिसून आली. गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.
BCCI सोबत अपोलो टायर्सचा हा करार 2027 पर्यंत आहे. त्यातंर्गत टीम इंडियाच्या प्रत्येक सामन्यासाठी 4.5 कोटींचा करार निश्चित झाला आहे. या बातमीचा परिणाम शेअर बाजारात ही दिसून आला. अपोलो टायर्सच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली. बाजार बंद होण्याच्या काही मिनिटांपूर्वी टायर उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची उसळी दिसून आली. मंगळवारी बाजार सुरू होताच 479.45 रुपयांवर होता. BCCI सोबत करार होताच या शेअरची किंमत 490.80 रुपयांवर पोहचली. अजून या शेअरमध्ये उसळी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपोलो कंपनीला मिळाली संधी
टीम इंडियाचा यापूर्वीची प्रयोजक ड्रीम-11 होती. 2023 मध्ये या कंपनीने BCCI सोबत 358 कोटी रुपयांचा करार केला होता. हा करार 3 वर्षांपर्यंत होता. पण सरकारच्या ऑनलाईन गेमिंग नियम, 2025 मुळे BCCI ने ड्रीम11 सोबतचा करार संपुष्टात आणला. भारतीय टीम आशिया कपमध्ये विना प्रायोजक खेळत आहे. ड्रीम11 पूर्वी मार्च 2023 पर्यंत BYJU’S टीम इंडियाची प्रायोजक होती. आता अपोलो कंपनीला ही संधी देण्यात आली आहे.
जगातील 7 वी सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी
अपोलो टायर्स लिमिटेड ही जगातील सातवी सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी 1972 मध्ये सुरू झाली होती. अपोलो टायर्सचा पहिला कारखाना हा केरळ राज्यातील त्रिशूर येथील पेरम्बरा येथे सुरू करण्यात आला होता. कंपनीचे सध्या भारतात 4, नेदरलँड आणि हंगेरीमध्ये प्रत्येकी एक उत्पादन युनिट आहे. सध्या ओमकार कंवर हे कंपनीचे संचालक आहेत. तर नीरज कंवर हे उपसंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. गुरुग्राम येथे कंपनीचे मुख्यालय आहे.
डिस्क्लेमर: ही कंपनी आणि शेअरची माहिती आहे. गुंतवणुकीचा कोणताही सल्ला नाही.