
Centre of Policy Research and Governance: भारताची शहरं भविष्यात कशी असतील यावर मुंबईत काल जोरदार मंथन झाले. केंद्र धोरण संशोधन व शासकीय संस्था (CPRG) आणि राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (NSE) यांच्या संयुक्त उपक्रमातून आयोजित The Nagari-Future Cities Conclave मध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या संमेलनात ज्येष्ठ नियोजनकार, प्रशासकीय अधिकारी, अर्थशास्त्रज्ञ, शहरी तज्ज्ञ एकत्र आले. भारतीय शहरांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी प्रत्येकाने मोलाचा वाटा उचलला. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा आणि संजीव संन्याल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले.
काय म्हणाले मंगल प्रभात लोढा?
विशिष्ट कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नागरी नियोजनाचा लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असल्याचे म्हटले. देशातील घरं आणि शेजारी हे कल्पना आणि उद्यमशीलतेचे प्रतिक आहेत. आपल्या शहरांचं डिझाईन हे त्यानुषंगाने ऊर्जा निर्मिती करणारी असावीत यावर त्यांनी भर दिला. तसेच महिलांसाठी ही शहरं सुरक्षित आणि त्यांच्या विकासाला संधी देणारी असावीत असे मत त्यांनी मांडले.
क्रियाशीलतेवर दिला भर
तर पंतप्रधान आर्थिक सल्लागार मंडळाचे (PM-EAC) सदस्य संजीव संन्याल यांनी शहरासाठी कसा दृष्टिकोन हवा यावर मोठे भाष्य केले. भारताला शहरांचे स्वरुप आणि त्यांचा विकास यासाठी नवीन दृष्टिकोनातून विचार करण्याची संधी असल्याचे ते म्हणाले. वांद्रे-कुर्ला क़ॉम्प्लेक्सचा उल्लेख करत त्यांनी विकासाचे हे मॉडेल शक्य झाल्याचे सांगितले. तर यापुढचं पाऊल म्हणजे स्थानिक जडणघडणीचा विचार करून वैविध्यपूर्ण दृष्टिकोनातून शहराचा विकास व्हावा यावर त्यांनी भर दिला. त्यासाठीचे खास डिझाईन असावे असे त्यांनी स्पष्ट केले.
तर NSE चे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान यांनी शहरांच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि प्रशासकीय बदलाचे योगदान यावर भर दिला. शहरी व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज यावरही त्यांनी विस्तृत विवेचन केले.
तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील अंबेकर यांनी विस्तृत भूमिका मांडली. शहराच्या विकासात आर्थिकच नव्हे तर सामाजिक आणि मानवी पैलूंवरही त्यांनी भुमिका विषद केली. त्यांनी भविष्यातील पिढ्यांसाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताच्या शहरी रचनेतील मूलभूत पैलूंवरही पुनर्विचार करण्यावर भर दिला.
डॉ. रमणंद, संचालक, CPRG यांनी संमेलनाची गरज आणि शहरी विकास यावर प्रकाश टाकला. शहरं ही भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि हवामान यादृष्टीने महत्त्वाची ठिकाणं असल्याचे सांगत त्यांनी लोककेंद्रीत मजबूत शहरी विकासाचे मानचित्र यावेळी त्यांच्या विचारातून उभे केले. तर समारोप सत्रात, डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी दीर्घकालीन, टिकाऊ शहरी विकासाची गरज अधोरेखित केली. प्रगतीस अडथळा आणणारे जुनाट कायदे रद्द करण्यासाठीही आवाहन केले. मिलिंद भारते यांनी पालकत्व आणि लोकज्ञान याचे महत्त्व विषद केले.
या मान्यवरांनी मांडले विचार
या संमेलनात इतर अनेक तज्ज्ञांनी त्यांची मतं मांडली. त्यात रविशंकर श्रीवास्तव, प्रधान आयुक्त, उत्पन्न कर; डॉ. सौम्य कांत घोष, अंशकालीन सदस्य, पीएम-ईएसी; अलका आर्या, संचालक, दिल्ली विकास प्राधिकरण (DDA); मिलिंद सुदाकर मातरे, अध्यक्ष, राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट (NBT); प्रा. बद्री नारायण, कुलगुरू, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS); डॉ. निरंजन हिराणंदानी, संस्थापक आणि अध्यक्ष, हिराणंदानी ग्रुप; डॉ. राधाकृष्णन बी., CMD, MAHAGENCO; अतुल कुलकर्णी, संचालक, युरेशिया स्पेशल टेक्नॉलॉजीज; श्री बेदांता सैकिया, वर्टिकल हेड, एडिफाइस कन्सल्टंट्स प्रा. लि.; जितेंद्र भोळे, महासचिव, इंडिया टाऊन प्लॅनर्स संस्थान (ITPI); तरुण झा, मार्केटिंग प्रमुख, JSW स्टील; आणि इतर अनेक प्रख्यात शहरी तज्ज्ञ आणि प्रशासक यांचा समावेश होता.