
भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. या बातमीने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांचं व्यक्तिमत्व संपूर्ण जगाला माहित होतं की, त्यांच्या सारखं परत कोणी होणार नाही. व्यवसाय क्षेत्रातील सर्वात दिग्गज नाव आणि एक उदार व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.
रतन टाटा यांनी जेव्हा जेव्हा भारतात कोणतीही आपत्ती आली तेव्हा तेव्हा रतन टाटा यांनी मदतीचा हात पुढे केला. त्सुनामी असो की महापूर, कोरोना असो की कॅन्सर जेव्हा जेव्हा लोकांवर संकट आले तेव्हा त्यांनी पुढे येऊन मदत केली. या व्यक्तिमत्त्वाने संपूर्ण भारताचे मन जिंकले. बुधवारी त्यांच्या निधनाची बातमी येताच अनेकांना अश्रृ अनावर झाले. रतन टाटा आजारावर मात करुन परत येतील असं सगळ्यांना वाटत होतं. पण तसे झाले नाही.
देशातील सर्वात लोकप्रिय उद्योगपती आणि अब्जाधीश रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. 1991 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी समुहाला एका उंचीवर नेऊन ठेवले. देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी टाटा यांचं एक नाव आहे. टाटा समूहाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचले. त्यांची उदार व्यक्तीची प्रतिमा निर्माण झाली. लोकांसाठी ते प्रेरणास्थान बनले. छोटा व्यापारी असो वा मोठा उद्योगपती, प्रत्येकासाठी ते आदर्श राहिले.
रतन टाटा यांचा जन्म नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्याकडे झाला होता. त्यांचे पालक ते लहान असतानाच वेगळे झाले. त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले. 1959 मध्ये, रतन टाटा यांनी आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग केले. नंतर अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात ते शिकले. 1962 मध्ये ते देशात परतले आणि टाटा स्टीलच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला. एक कर्मचारी म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि जमशेदनगर प्लांटमध्ये कर्मचारी म्हणून काम केले आणि बारकावे शिकले.
वयाच्या 21 व्या वर्षी 1991 मध्ये रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. ऑटोपासून स्टीलपर्यंतच्या व्यवसायात ते गुंतले. चेअरमन झाल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेले.आजोबांनी स्थापन केलेल्या गटाचे नेतृत्व 2012 पर्यंत केले. 1996 मध्ये, टाटाने दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि 2004 मध्ये, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बाजारात सूचीबद्ध झाली. भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मभूषण (2000) आणि पद्मविभूषण (2008) देऊन सन्मानित केले.