
नवी दिल्ली | 8 February 2024 : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष वाईट ठरले. त्यांच्यावर सर्वच ग्रहांची नाराजी होती. पण हे नवीन वर्ष 2024 त्यांच्यासाठी लक्की ठरले आहे. आता अदानी समूहावरील हिंडनबर्गचे भूत जवळपास उतरले आहे. तर गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीत पुनरागमन केले आहे. गौतम अदानी हे 100 अब्ज डॉलर नेटवर्थ असलेल्या श्रीमंतांच्या यादीत दिमाखाने सहभागी झाले आहेत. त्यांच्या संपत्तीत 101अब्ज डॉलरची भर पडली आहे. या यादीत 30 व्या क्रमांकावर फेकले गेलेले अदानी आता टॉप-10 मध्ये लवकरच येण्याची शक्यता आहे.
एकाच दिवसात 22,600 कोटींची कमाई
ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार, अब्जाधीश गौतम अदानी यांची संपत्ती एकाच दिवसात 2.73 अब्ज डॉलर म्हणजे 22,600 कोटी रुपयांहून अधिकने वाढली आहे. त्यामुळे त्यांची नेटवर्थ वाढून 101 अब्ज डॉलर झाली आहे. या संपत्तीमुळे ते जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत दोन क्रमांक पुढे आले आहेत. आता ते या यादीत 12 व्या क्रमांकावर पोहचले आहेत. याप्रकरणात गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांना सुप्रीम कोर्टात पण मोठा दिलासा मिळाला आहे.
मुकेश अंबानी यांच्यापेक्षा मागे
संपत्तीत वाढ झाल्याने गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत भारतीय अब्जाधीश आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापेक्षा केवळ एक क्रमांक मागे आहेत. रिलायन्स समूहाचे चेअरमन अंबानी यांची एकूण नेटवर्थ, संपत्ती 1.1 अब्ज डॉलर अर्थात 9123 कोटी रुपयांहून अधिक वाढून 108 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यात आता केवळ 7 अब्ज डॉलरचे अंतर उरले आहेत.
जगातील टॉप- 5 अब्जाधीश
जगातील श्रीमंतांच्या यादीत 205 अब्ज डॉलरसह एलॉन मस्क हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर एमेझॉनचे जेफ बेजोस आहेत. त्यांची नेटवर्थ 196 अब्ज डॉलर इतकी आहे. तर फ्रान्सचे अब्जाधीशी बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती 186 अब्ज डॉलर इतकी आहे. ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत मार्क झुकरबर्ग (169 अब्ज डॉलर) चौथ्या क्रमांकावर आहेत. तर बिल गेट्स (146 अब्ज डॉलर) पाचव्या क्रमांकवर आहेत.