सोने-चांदीत पुन्हा मोठी उलथापालथ? आगामी काळात दर वाढणार की घसरणार, तज्ज्ञांचे मत काय?

Gold Silver Price Forecast : तुम्ही येत्या काही दिवसांत सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

सोने-चांदीत पुन्हा मोठी उलथापालथ? आगामी काळात दर वाढणार की घसरणार, तज्ज्ञांचे मत काय?
Gold Silver Price Prediction
Image Credit source: Google
| Updated on: Jul 19, 2026 | 10:44 PM

गेल्या काही काळापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. जर तुम्ही येत्या काही दिवसांत सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. यामागे पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांकडून येणारे आर्थिक संकेत हे प्रमुख कारणे आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गुंतवणूकदारांचे लक्ष सध्या अमेरिकेतील साप्ताहिक बेरोजगारी दाव्यांचे आकडे, प्राथमिक पीएमआय अहवाल तसेच युरोप आणि चीनच्या केंद्रीय बँकांच्या निर्णयांकडे असेल. या घडामोडींवरून जगभरातील व्याजदरांची पुढील दिशा काय असेल, याचा अंदाज बांधला जाणार आहे. या घडामोडींनंतर किमती कमी किंवा जास्त होऊ शकतात, त्यामुळे गुंतवणूक दारांनी खरेदीसाठी वाट पाहणे सोयीस्कर ठरेल.

अमेरिका-इराण तणावाचा परिणाम

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवरील हल्ल्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणविरोधात नव्याने हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आहे. या परिस्थितीचा परिणाम कच्च्या तेलासह सोने-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांवरही होण्याची शक्यता आहे.

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटी आणि करन्सी रिसर्च विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते, महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी सोन्यावर दबाव कायम राहू शकतो. मात्र, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाकडेही गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष असेल.

गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात घसरण

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑगस्टमध्ये डिलिव्हर होणारे सोने गेल्या आठवड्यात सुमारे 2,572 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1.40 लाख रुपयांवर बंद झाले. तर सप्टेंबरमध्ये डिलिव्हर होणारी चांदी 6,261 रुपयांनी घसरून प्रति किलो 2.16 लाख रुपयांवर आली. जागतिक बाजारातही अशीच घसरण दिसून आली. कॉमेक्सवर सोन्याच्या किमती सुमारे 2.3 टक्क्यांनी, तर चांदीच्या किमती 6.4 टक्क्यांनी घसरल्या.

एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक जतिन त्रिवेदी यांच्या मते, मजबूत अमेरिकन डॉलर, महागडे कच्चे तेल आणि दीर्घकाळ उच्च व्याजदर कायम राहण्याची शक्यता यामुळे सोन्यावर दबाव वाढला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, किंमतींमध्ये थोडी वाढ होताच गुंतवणूकदारांकडून नव्याने खरेदी करण्याऐवजी नफा वसूल करण्याला प्राधान्य दिले. जर जागतिक तणाव आणखी वाढला, तर सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढून सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा तेजी येऊ शकते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सावध पावले उचलणे गरजेचे आहे.

Follow Us