
Gold-Silver Price Crash : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सुरू असलेला तेजीचा वेग शुक्रवारी अचानक थांबला. तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि वाढत्या किमतींबद्दल काळजीत असाल, तर आजची बातमी तुम्हाला दिलासा देणारी ठरू शकते. 29 जानेवारी रोजी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, 30 जानेवारीच्या म्हणजेच आज, शुक्रवारी सकाळी सोनं- चांदी या मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत घबराट पसरली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं आणि चांदी दोन्हीही मोठ्या प्रमाणात घसरले. गुरुवारी तेजीत असलेल्या बाजारात आज वेगळंच चित्र होतं.
मोठी घसरण
MCX वर सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही धातू 5 टक्क्यांहून अधिक घसरले. 30 जानेवारी रोजी सकाळी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 5.55 टक्क्यांनी घसरून 1,60,001 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ही घसरण लक्षणीय आहे कारण सोनं अलीकडेच 1,93,096 या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलं होतं. मात्र आज, सोन्याचे भाव अंदाजे 9 हजार 402 रुपयांनी घसरले आहेत.
दरम्यान, दुसरीकडे चांदीचे दर 4.18 टक्क्यांनी घसरले आणि 1 किलोसाठी चांदीची किंमत 3,83,177 रुपये झाली. चांदीच्या किमतीत फक्त एकाच दिवसात 16,716 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी चांदीने 4,20,048 रुपये प्रति किलोचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता, परंतु आजच्या नफा वसुलीमुळे किमती खाली आल्या.
किरकोळ बाजारात परिस्थिती काय ?
आज केवळ फ्युचर्स मार्केटच नाही तर किरकोळ बाजारातही मंदी दिसून आली आहे. सामान्य खरेदीदारांसाठी ही एक चांगी संधी असू शकते. बुलियन वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, 30 जानेवारी रोजी किरकोळ बाजारात सोन्याचा भाव 5,300 रुपयांनी घसरून 1,65,180 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दरम्यान, चांदीचा भाव 23,360 रुपयांनी घसरून 3,79,130 रुपये प्रति किलो झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारातील गोंधळामुळे भारतीय बाजारावरही दबाव निर्माण झाला. जागतिक स्तरावर, स्पॉट गोल्ड 1.65 % घसरून 5,217डॉलर प्रति औंस झाले, जे एका दिवसापूर्वी 5,594.82 २ डॉलरचा विक्रमी उच्चांक होता. त्याचप्रमाणे, स्पॉट चांदीचा भावही 2.86 टक्क्यांनी घसरून 110 डॉलर प्रति औंस झाला.