
Highest Salary in India News: भारतात पगाराचा आकडा सातत्याने बदलत आहे. देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक पगार मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर सर्वात कमी वेतन कोणत्या राज्यात मिळते याविषयीची चर्चा आता समाज माध्यमावर रंगली आहे. RPG समुहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर वाद पेटला आहे. प्रत्येक राज्यातील सरासरी मासिक वेतनाचे आकडे त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या पोस्टनुसार, जेव्हा तळागळातील कर्मचाऱ्याचे वेतन वाढेल. तेव्हा भारत सशक्त आणि समृद्ध होईल. भारतातील कोणते राज्य सर्वाधिक पगार देतात? महाराष्ट्राचा यामध्ये कितवा क्रमांक आहे?
सर्वाधिक पगार कुठे?
फोर्ब्स ॲडव्हायझर इंडियाचे हर्ष गोयंका यांनी नवीन आकडेवारी सादर केली आहे. त्यानुसार, 2025 पर्यंत भारताचे सरासरी मासिक वेतन 28000 रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. देशाची राजधानी दिल्ली, 35000 रुपयांच्या सरासरी मासिक वेतनासह या यादीत सर्वोच्च स्थानावर आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात सरासरी मासिक वेतन 33000 रुपये इतके आहे.
कोणत्या क्रमांकावर महाराष्ट्र?
बेंगळुरू हे आयटी आणि स्टार्टअप हब आहे. येथे टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. इथे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. कंपन्या कर्मचाऱ्यांना तगडे वेतन देतात. तर महाराष्ट्राचा क्रमांक सरासरी वेतनात तिसरा आहे. महाराष्ट्रात सरासरी मासिक वेतन 32000 रुपये इतके आहे. तर त्यानंतर तेलंगाणा या राज्याचा क्रमांक आहे. येथे कर्मचाऱ्याला सरासरी 31000 रुपये प्रति महिना पगार मिळतो. मुंबई आणि पुणे येथे व्यावसायिक आणि हैदराबाद येथे आयटी कंपन्यांचे जाळे वाढले आहे. त्यामुळे या राज्यात सरासरी मासिक वेतनात वाढ झाली आहे.
बिहारची स्थिती सर्वात भयावह
बिहारमध्ये भारतातील सर्वात कमी सरासरी मासिक वेतन मिळते. येथे सरासरी मासिक वेतन केवळ 13500 रुपये मिळते. त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटे, येथे 13000 रुपये सरासरी मासिक वेतन मिळते. नागालँडमध्ये पगाराचा आकडा 14000 तर मिझोरमही या यादीत काठावर आहे. या राज्यात मर्यादीत रोजगार, लघु उद्योग, कमी गुंतवणूक यामुळे या राज्यात पगाराचा आकडा अगदी तोकडा आहे.
दक्षिण भारतातील राज्यात मजबूत पगार
दक्षिण भारतातील राज्य रोजगार आणि पगार याबाबतीत अग्रेसर आहेत. कर्नाटकाशिवाय तामिळनाडू राज्यातील सरासरी मासिक वेतन 29000, आंध्र प्रदेशमध्ये 26000 आणि केरळमध्ये सरासरी मासिक वेतन 24500 इतके आहे.