LPG सिलेंडरसाठी पुन्हा रांगा लावाव्या लागणार? कोणतं संकट येणार? नवीन अपडेट काय?
इराण-अमेरिका तणावामुळे होर्मुज स्ट्रेटमधील तेल-गॅस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताची एलपीजी आयातीवरील होर्मुज निर्भरता घटली असली तरी, हा जलमार्ग एक आठवडा बंद राहिल्यास मोठे संकट उभे राहू शकते. देशांतर्गत उत्पादन वाढवत असले तरी, भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहणे महत्त्वाचे आहे.

इराण आणि अमेरिकेतील तणाव अजून काही थांबलेला नाही. आता या युद्धाच्या केंद्रस्थानी होर्मुज स्ट्रेट आलं आहे. त्यामुळेच होर्मुज स्ट्रेटमधून तेल आणि गॅसने भरलेले जहाज बाहर काढणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य माणसांवर घरगुती गॅस सिलेंडरच्या कमतरतेचं संकट घोंगावताना दिसत आहे. गेल्यावेळी गॅस सिलेंडरची कमतरता निर्माण झाल्यावर गॅस गोदामे आणि एजन्सीच्या बाहेर रांगाच रांगा लागल्या होत्या. आता परत तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगाच्या तुलनेत भारतात काय स्थिती असेल याचाच घेतलेला हा आढावा.
भारतापुरतं सांगायचं झालं म्हणजे भारतावरील हे संकट थोडं कमी आहे. युद्धापूर्वी भारतात एलपीजी गॅसची 90 टक्के आयात होर्मुज स्ट्रेटमधूनच होत होती. पण आता हे अवलंबित्व अत्यंत कमी झालं आहे. भारतात अमेरिकेसह इतर अनेक देशातून एलपीजी येत आहे. त्यामुळे भारत आता पूर्णपणे होर्मुजवर अवलंबून राहिलेला नाही. त्यामुळेच अमेरिका आणि इराणमध्ये अधूनमधून युद्ध भडकलं तरी भारतावर त्याचा फार परिणाम झालेला नाही.
किती एलपीजी भारतात येतो?
भारत आता रोज 37,000-38,000 मॅट्रिक टन LPG बनवत आहे. आता देशातील रिफायनरींचं लक्ष्य 4,000 मॅट्रीक टन प्रतिदिन म्हणजे 10% हून अधिक वाढ करणं आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या सूत्रानुसार, सध्या तरी स्टॉक योग्य आहे. होर्मुज स्ट्रेटहून पुरवठा होत आहे. पण या मार्गावर फार विसंबून राहता येणार नाही. एका आठवड्यासाठी जरी हा मार्ग बंद झाला तरी अडचणींचा मोठा डोंगर उभा राहू शकतो.
आयात घटवली
युद्धानंतर भारताने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने एलपीजीची आयात मोठ्या प्रमाणावर घटवली असून देशांतर्गत उत्पादनावर अधिक भर दिला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये एलपीजी गॅसचा वापर वर्षाला सरासरी 17 टक्के कमी झाला आहे. घरे, व्यावसायिक वापरकर्ते आणि उद्योग, सर्वांवर याचा परिणाम झाला. उद्योगांमधील होलसेल LPG (एलपीजी) वापरात सर्वाधिक घट झाली असून, जुलैमध्ये तो सुमारे ८०% ने घसरला.
हल्ले वाढले आणि…
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणने एकमेकांच्या जहाजांवर हल्ले चढवले. हे हल्ले वाढत राहिल्याने होर्मुजमधील दळणवळण सामान्य होण्याची चिन्हे कमी झाली. हा जलमार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी जगातील 20 टक्के कच्चे तेल आणि गॅसचा पुरवठा याच मार्गाने होत होता. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीपर्यंत तेलाच्या किंमती वाढलेल्याच राहील, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिले होते.
वापर आणि आयात घटली
ईराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर भारतात एलपीजीची आयात आणि वापर दोन्ही कमी झाले आहे. ऑगस्टमध्ये ही आयात 25 टक्क्याने कमी होऊन 14.5 लाख टन झाली आहे. युद्ध काळातील हा सर्वाधिक मासिक आकडा आहे.