
How To Get Free From Loan : आजकालची वाढती महागाई, मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च यासह अचानक आलेली वैद्यकीय आणीबाणी या सर्व कारणांमुळे आपले खर्च वाढलेले आहेत. अनेकदा हा खर्च भागवण्यासाठी आपण वैयक्तिक कर्जाची मदत घेतो. परंतु आपण या चक्रव्यूहात अडकून पडतो. कालांतराने कर्जाची परतपेड एवढी अवघड होऊन जाते की आलेला पगार पुढच्याच काही दिवसांत संपून जातो. त्यामुळेच तुमच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी योग्य नियोजन आखणे गरजेचे आहे. तुमच्यावर असलेल्या कर्जातून लवकरात लवकर कसे मुक्त व्हावे हे जाणून घेऊ या….
तुमच्या डोक्यावर वेगवेगळ्या कर्जाचं ओझं असेल तर त्या प्रत्येक कर्जाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असायला हवा. उदाहरणार्थ गृहकार्जावरील व्याजदर कमी असतो. तर क्रेडिट कार्ड किंवा तुम्ही घेतलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजाचा दर हा खूप जास्त असतो. त्यामुळे तुमच्यावर असलेल्या कर्जाची यादी तयार करा आणि अशा कर्जाचा व्याजदर आणि ईएमआय यावर लक्ष द्या. जास्त व्याजदर असणाऱ्या कर्जाची लवकर परतफेड करण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने पैसे काढलेले असतील तर तुम्ही अगोदर या पैशांची परतफेड केली पाहिजे. या महिन्याच्या कर्जाफेडीची रक्कम पुढच्या महिन्यावर ढकलू नये. दोन ते तीन टप्प्यांत क्रेडिट कार्डच्या मदतीने घेतलेल्या पैशांची परतफेड करावी. तसेच तुम्ही वैयक्तिक कर्ज घेतलेले असेल तर अशा कर्जाचा व्याजदरही जास्त असतो. असे वैयक्तिक कर्जही लवकरात लवकर संपवून टाकावे.
कधीकधी पगार कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती होते. त्यामुळे तुम्ही महिन्याला किती पैसे खर्च करताय, याचा हिशोब करावा. प्रत्येक महिन्याला पैसे नेमके कुठे जात आहेत, याची नोंद करावी. यामुळे तुम्ही वायफळ कुठे खर्च करत आहात का? हे समजते आणि पैसे खर्च होत नाहीत.