W,W,W,W,W..! हार्षित राणाचा पंच, न्यूझीलंडच्या फलंदाजासाठी ठरला डोकेदुखी
गुवाहाटी टी20 सामन्यातील पहिल्याच षटकात हार्षित राणाने कमाल केली. त्याने तिसऱ्या चेंडूवर विकेट काढली. ही विकेट त्याच्यासाठी खास ठरली. कारण त्याने विकेटचा पंच मारला. नेमकं काय झालं ते समजून घ्या.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम गोलंदाजी स्वीकारली असली तरी या मैदानात दव पडलं होतं. त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी असल्याचं दिसून आले. पण अशा स्थितीतही भारताने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकापासून भारताने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं. अर्शदीप सिंगला आराम दिला असल्याने पहिलं षटक सूर्यकुमार यादवने हार्षित राणाच्या हाती सोपवलं होतं. पहिल्याच षटकात त्याने टीम इंडियाला विकेट मिळवून दिली. टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या डेवॉन कॉनवेला तंबूचा रस्ता दाखवला. डेवॉन कॉनवेने भारताविरूद्ध प्रत्येक फॉर्मेटमध्ये धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची विकेट मिळणं खूपच गरजेचं होतं. हे काम हार्षित राणाने केलं. डेवॉन कॉनवे या सामन्यात फक्त एक धाव करण्यात यशस्वी ठरला.
हार्षित राणाच्या गोलंदाजीवर डेवॉन कॉनवेने उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण मिड ऑनला असलेल्या हार्दिक पांड्याने झेल पकडण्यात चूक केली नाही. विशेष म्हणजे हार्षित राणाने डेवॉन कॉनवेला पाचव्यांदा बाद केलं. पाच वेळा डेवॉन कॉनवेने हार्षित राणाचा सामना केला. पण प्रत्येक वेळी त्याने कॉनवेला तंबूचा रस्ता दाखवला आहे. विकेट काढल्यानंतर हार्षितने कॉनवेला पाच बोट दाखवून आनंद साजरा केला.
WOW!
How about that for a catch from Hardik Pandya 😎
Wicket in the opening over for Harshit Rana 👏👏
Updates ▶️ https://t.co/YzRfqi0li2#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vFBWKCB2ze
— BCCI (@BCCI) January 25, 2026
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. या तिन्ही सामन्यात हार्षित राणाने डेवॉन कॉनवेची विकेट काढली होती. त्यानंतर टी20 मालिकेत दोघांचा दोन वेळा सामना झाला. या दोन्ही सामन्यात हार्षित राणाने त्याची विकेट काढली. वनडे आणि टी20 सामन्यात मिळून पाच वेळा विकेट काढली आहे. पाच डावात डेवॉन कॉनवेला फक्त 19 धावा करता आल्या आहेत.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवल्या आणि 153 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे. हार्षित राणाने या सामन्यात एकूण 4 षटकं टाकली आणि 1 विकेट काढली. तसेच 35 धावा दिल्या. हार्षित राणाने पहिल्याच षटकात विकेट काढली होती. त्यामुळे न्यूझीलंडवर दबाव वाढला होता. त्यामुळे धावगती रोखण्यात यश आलं होतं.
