
भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने आपल्या कोट्यवधी विमाधारकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि सोपी सेवा सुरू केली आहे. आता LIC चा प्रीमियम भरायचा असेल, तर शाखेत जाऊन रांगेत उभं राहण्याची गरज नाही. कारण LIC ने अधिकृतपणे WhatsApp वरून प्रीमियम भरण्याची डिजिटल सुविधा सुरू केली आहे. ग्राहकांना आता घरबसल्या केवळ काही सेकंदात त्यांचा हप्ता भरता येणार आहे.
या नव्या सुविधेमुळे LIC ने डिजिटल युगात एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. ग्राहकांचे वेळ, श्रम आणि कार्यालयीन अडचणी वाचवण्यासाठी ही सेवा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. WhatsApp हे देशातील सर्वाधिक वापरलं जाणारं चॅटिंग अॅप आहे, आणि LIC ने याचाच वापर करून विमाधारकांसाठी सहज संवाद व व्यवहार करण्याचा मार्ग खुला केला आहे.
LIC ने या सेवेसाठी अधिकृत WhatsApp नंबर जारी केला आहे 8976862090. या नंबरवरून ग्राहक विविध प्रकारच्या सेवा घेऊ शकतात, ज्यामध्ये प्रीमियम भरणं, पॉलिसी स्टेटस तपासणं, बोनस माहिती मिळवणं, कर्जाची शिल्लक पाहणं आणि पॉलिसी स्टेटमेंट डाऊनलोड करणं या गोष्टींचा समावेश आहे.
प्रीमियम भरण्यासाठी ग्राहकांना सर्वप्रथम या नंबरवर “Hi” असा मेसेज पाठवावा लागतो. त्यानंतर ग्राहकाला एक मेनू पाठवला जातो, ज्यामध्ये विविध सेवा क्रमांक दिलेले असतात. त्यातून “प्रीमियम पेमेंट” पर्याय निवडल्यावर ग्राहकाला पॉलिसी क्रमांक आणि जन्मतारीख विचारली जाते. ही माहिती दिल्यावर पेमेंट लिंक मिळते, ज्यावर क्लिक करून ग्राहक UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून प्रीमियम भरू शकतो.
ही संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि वापरायला सोपी आहे. यामुळे ग्राहकांना वेळ वाचतो, वडिलधारी वयाच्या किंवा ग्रामीण भागातील ग्राहकांनाही सहजपणे LIC सेवा वापरता येते. याशिवाय ही सेवा 24×7 उपलब्ध असल्याने सण, सुटी किंवा कार्यालयीन वेळेची अडचणही राहत नाही.
ही WhatsApp सेवा सध्या इंडिव्हिज्युअल पॉलिसीधारकांसाठी उपलब्ध आहे. परंतु यासाठी ग्राहकाची पॉलिसी LIC च्या डिजिटल डेटाबेसमध्ये आधीपासून रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे. जर तुमची पॉलिसी अजून रजिस्टर्ड नसेल, तर LIC च्या वेबसाइटवरून किंवा शाखेमार्फत एकदाच ई-रजिस्ट्री पूर्ण करावी लागेल.