Jio IPO: गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! 2G युझर्स ते AI पर्यंत, जिओसाठी मोठी झेप, आयपीओ येण्यापूर्वी ए टू झेड माहिती
Jio IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजने आता दूरसंचार क्षेत्रातही पाय रोवले आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा बहुप्रतिक्षित आयपीओ बाजारात दाखल होत आहे. गुंतवणूकदारांना किती मोठी संधी आहे? बाजारात त्याविषयी काय चर्चा आहे? आयपीओ येण्यापूर्वी ए टू झेड माहिती जाणून घ्या.

Jio IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजने बाजारात पुन्हा एकदा गरदा उडून दिला आहे. डिजिटल आणि दूरसंचार कंपनी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचा (JPL IPO) बहुप्रतिक्षित आयपीओ बाजारात येणार आहे. हा आयपीओ 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2026 या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. या माध्यमातून कंपनी बाजारातून तब्बल 30,213 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. या आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर 1,065 ते 1,119 रुपये इतका प्राईस बॅड निश्चित केला आहे. GEPL Capital, Ventura Securities आणि SMC Global या ग्लोबल ब्रोकरेज फर्म्सच्या अहवालानुसार, 2G ते 4G ते 5G वर ग्राहकांना अपग्रेडेशन मिळणार आहे. होम ब्रॉडबँड, एंटरप्राईज क्लाउड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जिओच्या व्यवसाय वृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका असेल. याशिवाय, जिओ प्रगत तंत्रज्ञान प्रणाली परदेशी टेलिकॉम कंपन्यांना उपलब्ध करून कमाईचा नवीन मार्ग चोखंदळणार आहे.
1. 261 दशलक्ष (26 कोटी) 2G युझर्सला अपग्रेड होण्याची मोठी संधी
जून 2026 पर्यंत जिओ प्लॅटफॉर्मवर 533.3 दशलक्ष ग्राहक होते. म्हणजे बाजारात अद्यापही 2G नेटवर्क युझर्सची मोठी संख्या आहे. GEPL कॅपिटलच्या अहवालानुसार, 30 जून 2026 पर्यंत 2G नेटवर्क वापरणारे 26 कोटी युझर्स होते. कंपनी या ग्राहकांना आता 2G ते 4G ते 5G वर घेऊन जाण्याच्या तयारीत आहे.
JioBharat फोनसारख्या 799 रुपयांच्या किफायतशीर पर्यायांमधून नवीन ग्राहक जोडण्याचा प्रयत्न आहे. कंपनीची प्रति युझर्स सरासरी मासिक कमाई वाढली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा आकडा 181.7 रुपये होता. तो 2027 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढून 215.6 रुपयांवर पोहचला आहे. तर प्रति ग्राहक मासिक डेटा वापर 43.7 GB च्या घरात पोहचला आहे.
2. होम ब्रॉडबँडमध्ये जिओची मोठी खेळी
जून 2026 पर्यंत JioFiber आणि JioAirFiber चे एकूण सब्सक्राईबर 28.6 दशलक्ष इतके होते. भारतामध्ये फिक्स्ड ब्रॉडबँडला मोठी संधी आहे. अजूनही या व्यवसायाची मोठी व्याप्ती व्हायची बाकी आहे. GEPL कॅपिटलच्या अहवालानुसार, 2026 च्या आर्थिक वर्षात भारतातील फिक्स्ड ब्रॉडबँडचा परीघ हा 21 टक्के होता. तर 2031 पर्यंत हा आकडा 46 टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता आहे. SMC Global नुसार, JioAirFiber त्या भागात वेगाने पसरू शकते जिथे फायबर जाळे टाकणे हे कठीण आणि अधिक खर्चिक आहे.
3. केवळ दूरसंचारच नाही, तर टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा मोठी झेप
ब्रोकरेज अहवालांमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्स केवळ एक टेलिकॉम ऑपरेटर म्हणून नाही, तर एक उच्च तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म म्हणून मोठी झेप घेण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. व्हेंटुरा सिक्युरिटीजने आयपीओला सब्सक्राईब रेटिंग दिले आहे. जिओने स्वतःचा स्वतंत्र 5G स्टॅक विकसीत केला आहे. 4G, 5G, 6G आणि AI तंत्रज्ञानाशी संबंधित 7,220 पेटेंटसाठी कंपनीने अर्ज दाखल केले आहे. ही मोठी जमेची बाजू आहे. तर कंपनीचे स्वतःचे AI प्लेटफॉर्म JioBrain नेटवर्क मोठी भूमिका बजावत आहे.
4. भारतीय तंत्रज्ञानाचा जगभरात धमाका
Jio Platforms भारतात विकास केलेले तंत्रज्ञान इतर देशांमधील दूरसंचार कंपन्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. GEPL Capital नुसार, प्रोप्रायटरी 5G कोर, क्लाउड-नेटिव RAN, OSS/BSS और फिक्स्ड वायरलेस एक्सेस सारख्या तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कमाईचे स्त्रोत तयार होतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर जिओ व्यवसाय क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकते.
Jio Platforms च्या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची आकडेवारी
प्रकार आकडेवारी
एकूण ग्राहक (जून 2026): 533.3 दशलक्ष
5G ग्राहक: 284.9 दशलक्ष
2G नेटवर्क युझर्स: 261.0 दशलक्ष
फिक्स्ड ब्रॉडबँड सदस्य: 28.6 दशलक्ष
फिक्स्ड ब्रॉडबँड : 46% (2031 पर्यंत वाढीचा अंदाज)
डिस्क्लेमर: ही केवळ माहिती आहे. कोणत्याही शेअर अथवा आयपीओमध्ये गुंतवणुकीचा टीव्ही 9 मराठी सल्ला देत नाही. गुंतवणूकीपूर्वी अर्थ सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.