LPG Cylinder Price : दर घटले नाही, तरीही 600 रुपयाने स्वस्त मिळतोय गॅस सिलेंडर? जाणून घ्या कसे?
उत्तर प्रदेशातील काही भागांत कमर्शिअल एलपीजी सिलेंडर अधिकृत दरापेक्षा 200-600 रुपयांनी स्वस्त मिळत आहे, तरी दर कमी झालेले नाहीत. इराण युद्धामुळे तुटवडा होता, आता पुरवठा वाढला आहे. जास्त स्टॉक क्लिअर करण्यासाठी एजन्सी कमी दराने विक्री करत आहेत. भारताने अनेक देशांमधून एलपीजी आयात वाढवल्याने पुरवठा स्थिर झाला.

सरकारी ऑयल मार्केटिंग कंपनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपाजी सिलेंडरच्या दरात बदल करत असते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या भावाच्या हिशोबाने हे फेरबदल केले जातात. या महिन्याच्या पहिल्या तारखेला कमर्शिअल एलपीजी म्हणजे 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 9.5 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील काही भागात कमर्शिअल सिलेंडर 600 रुपयाने स्वस्त मिळत आहे. कोणतेही दर कमी केलेले नसतानाही एवढ्या स्वस्तात सिलेंडर मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील काही गावात आणि छोट्या भागांमध्ये सरकारी किमतीपेक्षाही 200 ते 600 रुपयाने कमर्शिअल सिलेंडर स्वस्तात मिळत आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे, कुशीनगरमध्ये या सिलेंडरची किमत 2,946 रुपये आहे. पण काही ठिकाणी हे सिलेंडर 2,400 ते 2,700 रुपयांना मिळत आहे. या सिलेंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा आणि कॅटरिंग आदी सर्व्हिसेससाठी होत आहे.
किंमत कमी का झाली?
इराण युद्धामुळे काही महिन्यापूर्वी देशात गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. देशात सिलेंडर मिळणं कठिण झालं होतं. कमर्शिअल सिलेंडर मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागत होते. आता मात्र, सिलेंडरचा पुरवठा नियमित झाल्याने बराच फरक पडला आहे. कमर्शिअल सिलेंडरचा ज्यादा पुरवठा झाल्याने काही एजन्सी हे सिलेंडर कमी किंमतीत विकत आहेत. स्टॉक क्लिअर करण्यासाठी एजन्सी हे करत आहे. त्यामुळेच काही एजन्सीकडून सिलेंडर स्वस्तात मिळत आहे.
गॅसचा पुरवठा
कच्च्या तेलाची किमत गेल्या आठवड्यात 108 डॉलर प्रति बॅरलवर गेली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यात थोडा बदल झाला आहे. आज ब्रेंट क्रूडमध्ये किरकोळ घसरण झाली असून हा दर 99.14 डॉलर प्रति बॅरलवर ट्रेंड करत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताच्या एलपीजी आयातीवर मोठा परिणाम झाला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी भारताने अनेक देशातून एलपीजीची आयात वाढवली होती.
पूर्वी भारत 10 देशांकडून एलपीजीची आयात करत होता. आता ईराण युद्धानंतर 15 देशांकडून एलपीजी आयात केली जात आहे. यात अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. अमेरिकेतून भारताला एलपीजी येण्यासाठी 45 दिवस लागतात. अमेरिकेच्या टेक्सास बंदरापासून मुंबईचा समुद्र 22000 किलोमीटर दूर आहे. अमेरिका भारताचा सर्वात मोठा सप्लायर देश म्हणून पुढे येत आहे.