
सर्वसामान्यांचे नेहमी लक्ष लागलेलं असतं ते सोन्या-चांदीच्या किंमतीकडे. सध्या लग्नसराईचा मौसम असल्याने अनेकांना दागिन्यांच्या खरेदीचे वेध लागले आहेत, मात्र वाढत्या किंमतीमुळे दागिना घ्यायचा विचार सतत पुढे ढकलावा लागतोय. तुम्हालाही सोनं- चांदी विकत घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Crash) घसरण सुरूच आहे आणि हे मौल्यवान धातू दररोज स्वस्त होत आहेत. सोमवारी झालेल्या लक्षणीय घसरणीनंतर, मंगळवारी चांदीच्या किमतीत घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज उघडताच चांदीच्या किमती 4 हजार 600 रुपयांपेक्षा जास्त घसरल्या. एवढंच नव्हे तर चकाकणारं सोनही खाली घसरून उतरलं आहे. आता चांदी त्याच्या हाय लेव्हलपासून (Silver Crash From High) 1.80 लाख रुपयांनी स्वस्त होत आहे, तर सोनंही तब्बल 38 हजारांनी (Gold Cheaper) स्वस्त झालं आहे.
चांदीचा बुडबुडा फुटला ?
सर्वप्रथम चांदीच्या किमतींमध्ये सतत होणाऱ्या घसरणीबद्दल जाणून घेऊया. गेल्या काही दिवसांतच, चांदीचा बुडबुडा फुटल्यासारखे (Silver Bubble Burst) दिसतंय. 29 जानेवारी रोजी चांदीचा भाव पहिल्यांदाच 4 लाख रुपये प्रति किलो ओलांडून 4,20,048 च्या लाईफ टाईम हाय लेव्हलवर पोहोचला. मात्र आता चांदी घसरण होत असून या उच्च पातळीपासून आतापर्यंत चांदी 1,80,157 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.
मंगळवारी धाडकन पडले चांदीचे दर
या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी, एमसीएक्स उघडताच चांदीचा भाव घसरला. 5 मार्च रोजी एक्सपायरी असलेली चांदी सोमवारी, 2,39,891 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती आणि त्या तुलनेत, आज बाजार उघडताच चांदीचे दर 2,35,206 रुपयांवर पोहोचले. त्या हिशोबाने झटक्यातच 1 किलो चांदीचे भाव 4,685 रुपयांनी कमी झाले.
सोन्याचीही तीच अवस्था
चांदीच्या किमतीनंतर, सोन्याच्या किमतीबद्दल जाणून घेऊया. या मौल्यवान धातूमध्येही सतत घसरण होत आहे. मात्र, सोन्याच्या किमतीत अधूनमधून वाढ देखील दिसून आली आहे. मात्र, 2 एप्रिल रोजी संपणाऱ्या सोन्याच्या वायद्यांच्या किमती 1,54,760 वरून घसरून मंगळवारी प्रति 10 ग्रॅमसाठी 1,53,550 पर्यंत पोहोचल्या. याचा अर्थ MCX सोन्याचा दर 1 हजार 210 रुपयांनी कमी झाला.
29 जानेवारी रोजी सोन्याच्या किमतींनीही चांदीच्या बरोबरीने उच्चांक गाठला होता. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमती रॉकेटच्या वेगाने वाढून वेगाने 1,93,096 या उच्चांकापर्यंत पोहोचल्या. मात्र या पातळीवर पोहोचल्यानंतर, सोन्याच्या घसरणीची मालिका सुरू झाली, ज्याचे परिणाम अजूनही दिसून येत आहेत. सोन्याचा भाव त्याच्या उच्चांकावरून प्रति 10 ग्रॅमसाठी 38 हजार 336 रुपयांनी घसरला.