बजेटमधील ‘तो’ निर्णय स्तुत्य, मनसेकडून अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार

| Updated on: Feb 01, 2020 | 3:44 PM

आमच्या दोन्ही मागण्या प्राधान्याने जशाच्या तशा मान्य केल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार, असं ट्वीट बाळा नांदगावकरांनी केलं आहे

बजेटमधील तो निर्णय स्तुत्य, मनसेकडून अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार
Follow us on

मुंबई : बँक खात्यात जमा असलेल्या रकमेवर विमा हमीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय स्तुत्य असल्याचं सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे जाहीर आभार मानले (MNS Thanks FM Sitharaman on Budget) आहेत. या निर्णयानुसार बँक बुडाली, तर केंद्र सरकार ग्राहकांना एक लाखाऐवजी पाच लाख रुपये देणार आहे.

बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवरुन निर्मला सीतारमण यांचे आभार व्यक्त केले आहेत. ‘धन की बात, जनता के साथ’ असं लिहित नांदगावकरांनी केलेले ट्वीट मनसेच्या अधिकृत अकाऊण्टवरुनही रिट्वीट करण्यात आले आहे.

‘अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर काल आम्ही अर्थमंत्र्यांनी ठेवींवरील विमा संरक्षण हे एक लाखावरुन वाढवून 5 लाख करावे आणि इन्कम टॅक्स कमी करुन जसा मोठया Corporate House (उद्योगधंदे) ना दिलासा दिला, तसाच मध्यमवर्गीयांना दिलासा द्यावा, अशी जाहीर मागणी आमच्या फेसबुक पोस्टव्दारे जाहीररित्या केल्याचं नांदगावकरांनी लिहिलं आहे.

आमच्या मागण्यांची दखल घेत दोन्ही मागण्या प्राधान्याने जशाच्या तशा मान्य केल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार. यामुळे बँकेतील ठेवीदारांना आणि मध्यमवर्गीय टॅक्स पेयर्सना नक्कीच मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे. सरकारचा हा स्तुत्य निर्णय आहे आणि याचे आम्ही मनापासून स्वागत करतो, असंही त्यांनी पुढे लिहिलं आहे.

काय आहे निर्णय ?

सध्या एखादी बँक बुडाली, तर सरकार तिच्या ठेवीदारांना जास्तीत जास्त 1 लाख रुपये देते. पण ही मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेवर पाच लाख रुपयांची विमा हमी दिली जाईल. ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी चांगली यंत्रणा तयार केली जात असल्याचंही सीतारमण यांनी अर्थसंकल्पात म्हटलं आहे.

बँक ठेवींवरील विमा वाढवण्याची मागणी दीर्घकाळापासून होत आहे. सद्यस्थितीत एक लाख रुपये ही फारशी मोठी रक्कम होत नाही. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्याने बहुतांश लोक आपल्या आयुष्यभराचा कष्टार्जित पैसा बँकांमध्ये ठेवतात. पीएमसी बँक घोटाळ्यानंतर विमा रक्कम वाढवण्याच्या मागणीने जोर धरला होता. पीएमसी बँकेत कित्येक ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.

MNS Thanks FM Sitharaman on Budget