अंबानींचा नवा बिझनेस! रिटेल, डिजिटलनंतर आता दूधही विकणार; नवीन व्यवसायाची बाजारात एन्ट्री, किंम्मत किती?
Reliance Flavoured Milk Launch: अंबानींनी डेअरी मार्केटमध्ये नवा प्रयोग केला आहे. रिलायन्स कंझ्युमरचं ‘जॉयलँड’ फ्लेवर्ड मिल्क लॉन्च करण्यात आले आहे.

तेल, रिटेल, डिजिटल सेवा आणि मनोरंजन अशा अनेक व्यवसायांमध्ये विस्तार केलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आता दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची एफएमसीजी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड रेडी-टू-ड्रिंक डेअरी मार्केटमध्ये उतरल्यामुळे फ्लेवर्ड मिल्क आता अंबानींच्या अनेक व्यवसायांपैकी एक असेल. कंपनीने तामिळनाडूमध्ये आपला ‘जॉयलँड’ हा ब्रँड सादर केला आहे. यामध्ये केवळ २० रुपयांना फ्लेवर्ड दूध उपलब्ध आहे.
दूध दोन फ्लेवर्समध्ये उपलब्ध असेल. सध्या जॉयलँडने स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला हे दोन फ्लेवर्स सादर केले आहेत. दोन्ही फ्लेवर्स पिण्यासाठी तयार स्वरूपात ₹२० मध्ये उपलब्ध असतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जॉयलँड तामिळनाडूमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून, लवकरच इतर राज्ये आणि शहरांमध्येही सादर केले जाईल. सध्या ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च-गुणवत्तेची उत्पादने उपलब्ध करून देणे हे कंपनीचे ध्येय आहे.
उत्पादनाबद्दल बोलताना रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) चे संचालक टी. कृष्णकुमार म्हणाले की, रेडी-टू-ड्रिंक डेअरी मार्केटमध्ये प्रवेश करणे हे कंपनीचा व्यवसाय विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना पेयांचे आणखी पर्याय उपलब्ध होतील. जॉयलँडच्या माध्यमातून जास्तीत जास्त कुटुंबांना उच्च-गुणवत्तेची आणि परवडणारी दुग्ध उत्पादने उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, हे उत्पादन तामिळनाडूमध्ये सादर करण्यात आले आहे. देशभरात त्याचा विस्तार करण्याची योजना सुरू आहे. कंपनी भविष्यात जॉयलँडचे आणखी फ्लेवर्स सादर करेल. इतकेच नाही, तर ती इतर दुग्धजन्य पेयांच्या श्रेणींमध्येही प्रवेश करण्याची तयारी करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठे व्यावसायिक कुटुंब असलेल्या अंबानी कुटुंबाची आहे. या कुटुंबाने आपल्या छत्राखाली अनेक व्यवसाय स्थापित केले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज हा एक सुप्रसिद्ध आणि विश्वासार्ह व्यवसाय आहे. एखाद्या उत्पादनासोबत या कंपनीचे नाव जोडले जाणे, हेच त्याच्या गुणवत्तेची आणि विश्वासार्हतेची साक्ष आहे.
रिलायन्सने आपल्या ₹10 च्या ‘कॅम्पा’द्वारे शीतपेयांच्या बाजारपेठेत जोरदार प्रवेश केला होता आणि कोका-कोला व पेप्सीसारख्या जागतिक कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. आता, दुग्ध-आधारित पेयांच्या श्रेणीत प्रवेश करून, रिलायन्सने रेडी-टू-ड्रिंक दुग्धजन्य पेयांच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. या क्षेत्रात स्पर्धेची एक नवीन लाट दिसून येत आहे.
