
शेअर बाजारात गुंतवणूक अनेकांना मोठी जोखीम वाटते. त्यामुळे मध्यमवर्गातील अनेक जण, चाकरमानी, नोकरदार या वर्गात म्युच्युअल फंड आणि त्याचे विविध प्रकार अत्यंत लोकप्रिय आहेत. छोटी छोटी गुंतवणूक भविष्यात मोठी रक्कम होते. 2000 रुपयांची दरमहा एसआयपी केली तर तुम्ही काही वर्षात 1 कोटींचा फंड तयार करू शकता. अर्थात त्यासाठी योग्य फंडची निवड आणि अभ्यास करावा लागेल. तसेच तुमच्या गुंतवणुकीची समीक्षा पण करावी लागेल.
SIP चे गणित काय?
SIP मध्ये तुम्ही दरमहा एक ठराविक रक्कम, निश्चित कालावधीसाठी गुंतवता. म्युच्युअल फंड ही रक्कम शेअर बाजारात गुंतवतात. तर काही सरकारी बाँडमध्ये गुंतवतात. त्यानुसार, म्युच्युअल फंडचे विविध प्रकार असतात. तुम्ही जर योग्य फंडात दीर्घकाळ गुंतवणूक केली तर बाजारातील चढउताराचा होणारा परिणाम कमी होतो. एसआयपीची खरी ताकद ही त्याच्या कम्पाऊंड रिटर्नमधून मिळते. दरवर्षी व्याजाची रक्कम तुमच्या मुळ रक्कमेत जमा होते आणि त्यावर अजून व्याज मिळते. या कालावधीत एक छोटीशी गुंतवणूक मोठी रक्कम होते.
2000 रुपयांतून 1 कोटींचा फंड
जर तुम्ही दरमहा दोन हजारांची गुंतवणूक केली. तर वर्षाकाठी ही गुंतवणूक 24 हजारांच्या घरात पोहचते. या रक्कमेवर म्युच्युअल फंडाने सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा दिला तरी काही वर्षात ही रक्कम 1 कोटींच्या घरात पोहचते. 10 वर्षांत याच परताव्याने गुंतवणूक 4,64,678 रुपये इतकी होईल. तर 20 वर्षांनी त्याच अंदाजित 12 टक्के वार्षिक परताव्याने ही रक्कम 19,85,810 रुपये होईल. 30 वर्षांनी ही रक्कम 80,95,104 रुपये इतकी होईल. तर 32 व्या वर्षी तुमच्या दरमहा 2 हजारांच्या नियमीत गुंतवणुकीतून तुम्हाला 1 कोटी,1 लाख,45 हजार 350 रुपयांच्या फंडची उभारणी करता येईल. त्यासाठी तुम्ही गुंतवलेली रक्कम 7,68,000 रुपये इतकी असेल.
तुम्हाला जर लवकर करोडपती व्हायचे असेल तर गुंतवणुकीची रक्कम मात्र तुम्हाला वाढवावी लागेल. समजा तुम्ही 5000 रुपयांची दरमहा गुंतवणूक केली आणि सरासरी 12 टक्के परतावा मिळाला तर 24 वर्षांतच तुम्ही एक कोटींचा फंड उभारू शकता. म्हणजे दरमहा जितकी मोठी रक्कम तुम्ही गुंतवाल, तितक्या लवकर तुम्ही करोडपती होऊ शकता.
डिस्क्लेमर : ही सामान्य माहिती आहे. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही शेअर बाजारातील चढउतारावर अवलंबून असते. त्यानुसार फायदा-तोटा होऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराकडून मार्गदर्शन जरुर घ्याल.