
Diaspora Remittances Hit New Record: देशाच्या अर्थव्यवस्थेत विदेशात राहणाऱ्या भारतीयांचे मोठे योगदान आहे. मागील आर्थिक वर्षात विक्रमी संख्येने विदेशात राहणाऱ्या भारतीयांनी देशात पैसा पाठवला आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात 135.46 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1.16 लाख कोटी रुपये आपल्या परिवारांकडे पाठवले आहे. आतापर्यंत वर्षभरात पाठवलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.
आठ वर्षांपूर्वी अनिवासी भारतीयांनी 61 अब्ज डॉलर्स पाठवले होते. परंतु आज ही रक्कम दुप्पट झाली आहे. म्हणजेच वार्षिक आधारावर पाहिले तर त्यात सुमारे 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी अनिवासी भारतीयांची समृद्धी दाखवत आहे. गेल्या 10 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारत हा सर्वाधिक रेमिटन्स (परदेशातून आपल्या देशात पाठवलेला पैसा) मिळवणारा देश आहे. जागतिक बँकेच्या अहवालात त्याची पुष्टी करण्यात आली आहे. या अहवालानुसार 2024 मध्ये मेक्सिको 5.8 लाख कोटी रुपयांच्या रेमिटन्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच चीन 4.1 लाख कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
आठ वर्षांत रेमिटेंसची रक्कम दुप्पच झाली आहे. सन 2014-15 दरम्यान 6 लाख कोटी, 2015-16 दरम्यान 5.62 लाख कोटी, 2016-17 दरम्यान 5.26 लाख कोटी, 2017-18 दरम्यान 5.93 लाख कोटी, 2018-19 दरम्यान 6.55 लाख कोटी, 2019-2020 दरम्यान 7.13 लाख कोटी, 2020-21 दरम्यान 6.87 लाख कोटी रुपये भारतात आले.
आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान 7.64 लाख कोटी, 2022-23 दरम्यान 9.64 लाख कोटी, 2023-24 दरम्यान 10.18 लाख कोटी आणि 2025-25 दरम्यान 11.63 लाख कोटी रुपये अनिवासी भारतीयांनी देशात पाठवले. आरबीआयच्या अहवालानुसार परदेशातून येणाऱ्या एकूण रेमिटन्सपैकी 45 टक्के वाटा ब्रिटन, अमेरिका आणि सिंगापूरचा आहे. सध्या व्यापार तूटच्या सुमारे 47 टक्के रक्कम रेमिटन्स भरून काढत आहेत. भारतात रेमिटन्स मिळवणाऱ्या राज्यांमध्ये केरळ, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. विशेषतः केरळमध्ये पैसे पाठवणारे सर्वाधिक संख्येने अनिवासी भारतीय आहे. त्यात आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांचे योगदान जास्त आहे.