आज तुमचा शेवटचा दिवस.., सकाळी 6 वाजता मेल, या कंपनीने 12000 भारतीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं
Oracle Layoffs India: ओरॅकल या कंपनीने भारतासह अनेक देशांमध्ये अचानक कर्मचारी कपात सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांना सकाळीच ई-मेल पाठवून नोकरी सोडण्याची माहिती दिली जात आहे. त्यासाठी त्यांना कोणतीच पूर्वसूचना दिली जात नाहीये.

ओरॅकल कंपनीने आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये या कंपनीने कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सकाळी 6 वाजता थेट ई-मेल पाठवून सांगितलं गेलं की तुम्हाला नोकरीवरून काढण्यात आलं आहे आणि तोच त्यांचा शेवटचा कामाचा दिवस (वर्किंग डे) असेल. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात कोणतीही पूर्वकल्पना किंवा पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. एचआरने त्यांच्याशी कोणताही संपर्क साधला नव्हता आणि मॅनेजरनेही याबाबत त्यांना काहीच माहिती दिली नव्हती.
ओरॅकल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना थेट ‘ओरॅकल लीडरशिप’कडून एक मेल आला, ज्यामध्ये लिहिलं होतं, ‘कंपनीच्या संघटनात्मक बदलांचा भाग म्हणून तुमचा नोकरीतील कार्यकाळ संपुष्टात आणलं जात आहे.’ या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांची संध्या 30 टक्क्यांनी कमी केली आहे. भारतातही याचा थेट परिणाम दिसू लागला आहे. नेटसूट इंडिया डेव्हलपमेंट सेंटरमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर, इंजीनिअर आणि मॅनेजर स्तराच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे. तर रेव्हेन्यू अँड हेल्थ सायन्सेस आणि SVOS (SaaS and Virtual Operations Services) यांसारख्या विभागात जवळपास 30 टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. अनेक टीममधून एकाच वेळी 16 हून अधिक इंजीनिअर्सना काढून टाकण्यात आलं आहे.
कर्मचारी कपातीनंतर लगेचच त्यांना कंपनीचा सिस्टीम वापरण्यास मनाई करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं की, 3 एप्रिलपर्यंतच ते काम करू शकतील, त्यानंतर त्यांना एक महिन्याची गार्डन लीव्ह दिली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या लॅपटॉपमध्ये ट्रॅकिंग टूल्स इन्स्टॉल केले आहेत. त्याचप्रमाणे कंपनीचा कोणताही डेटा किंवा कोड कॉपी न करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. आणखी 20 ते 30 हजार कर्मचारी भविष्यात आपली नोकरी गमावू शकतात, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आजच्या AI च्या जमान्यात कुणाच्याही नोकरीची हमी राहिली नसून तुम्ही कितीही जुने कर्मचारी असाल तरी कोणत्याही क्षणी तुम्हाला नोकरीतून कमी केल्याचा ई-मेल तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन तुम्ही बेरोजगार होऊ शकता, हे Oracle कंपनीच्या ताज्या निर्णयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलं. हे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 1, 2026
ओरॅकल कंपनी 8 ते 10 अब्ज डॉलर्सची खर्च बचत करण्याच प्रयत्न करत आहे. ही कंपनी आपल्या एआय डेटा सेंटरचा विस्तार करण्यासाठी या पैशांचा वापर करणार आहे. गेल्या काही महिन्यांत या कंपनीवर अंदाजे 58 अब्ज डॉलर्सचं कर्ज झालं आहे. त्याच्या शेअर्समध्येही लक्षणीय घसरण झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवारांचं ट्विट-
‘आजच्या AI च्या जमान्यात कुणाच्याही नोकरीची हमी राहिली नसून तुम्ही कितीही जुने कर्मचारी असाल तरी कोणत्याही क्षणी तुम्हाला नोकरीतून कमी केल्याचा ई-मेल तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन तुम्ही बेरोजगार होऊ शकता, हे Oracle कंपनीच्या ताज्या निर्णयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलं. हे कितीही महत्त्वाचं असलं तरी आज सुरु असलेल्या राजकारणात ते कुणालाही दिसणार नाही. आपल्याला मात्र राजकारणाच्या पलीकडं जाऊन सिस्टिमच्या विरोधात लढावं लागणार आहे, हे प्रत्येकानेच ध्यानात घेण्याची गरज आहे,’ असं त्यांनी म्हटलंय.