PNB Loan Fraud : मोठी बातमी! देशातल्या मोठ्या बँकेत 2000 कोटींचा घोटाळा; तुमच्या पैशांचं काय होणार?

देशभरात नावाजलेल्या एका बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोळ झाला आहे. खुद्द बँकेनेच याबाबत माहिती दिली आहे. ही घटना समोर आल्यानंत बँकेच्या शेअर्सवर परिणाम झाला आहे.

PNB Loan Fraud : मोठी बातमी! देशातल्या मोठ्या बँकेत 2000 कोटींचा घोटाळा; तुमच्या पैशांचं काय होणार?
pnb bank scam
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 27, 2025 | 3:18 PM

लोक आपल्या आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवतात. कमवलेले पैसे कुठेही जाऊ नयेत, ते चोरी होऊ नयेत यासाठी बँकेत पैसे ठेवणे हे सर्वात सुरक्षित मानले जाते. परंतु आता अशाच एक बँकेत अजब प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बँकेमध्ये तब्बल 2434 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा कर्जासंदर्भात आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याबाबत खुद्द या बँकेनेच माहिती दिली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शुक्रवारी (27 डिसेंबर) या बँकेचे शेअर्स काही साधारण अर्ध्या टक्क्यांनी गडगडले.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार पंजाब नॅशनल बँकेत हा घोटाळा झाला आहे. या बँकेने 26 जानेवारी रोजी भांडवली बाजार बंद झाल्यानंतर रेग्युलेटरी फायलिंगमध्ये 2434 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती दिली. या घोटाळ्याबाबत बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेलाही माहिती दिलेली आहे. या माहितीनुसार एसआरईआय इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड (एसईएफएल) आणि एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेडशी (एसआयएफएल). सबंधित आहे.

दिलेल्या कर्जाचं काय झालं?

पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार एसआरईआय इक्विपमेंट फायनान्स लिमिटेडने 1,240.94 कोटी रुपये तर एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेडने (एसआयएफएल) 1,193.06 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. या दोन्ही कंपन्यांना पंजाब नॅशनल बँकेने कर्ज दिले होते. दोन्ही कंपन्यांनी या कर्जाची परतफेड अद्याप केलेली नाही. पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार या थकवलेल्या कर्जाची 100 टक्के प्रोव्हिजनिंग करण्यात आलेली आहे. कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेअंतर्गत ही प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे.

बँकेच्या शेअर्सची काय स्थिती?

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या समभागांत साधारण अर्ध्या टक्क्यांची घसरण झाली. शुक्रवारी दिवसाअखर या बँकेच्या शेअरची किमत 0.50 टक्क्यांनी कमी होऊन 120.35 रुपयांवर स्थिरावली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या बँकेचे शेअर चांगल्या स्थितीत आहेत. गेल्या सहा महिन्यांत या बँकेच्या शेअरने 13 टक्क्यांनी परतावा दिलेला आहे. 2025 वर्षात या बँकेच्या शेअरने 17 टक्क्यांचा परतावा दिलाय.