
अमेरिकेतील प्रतिष्ठित टाइम मॅग्झीनने 2024 मधील जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांची यादी तयार केली आहे. या यादीत भारताचा दबदबा दिसत आहे. त्यात भारतामधील तीन कंपन्यांची नावे आहेत. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि टाटा ग्रुपचा समावेश आहे. टाइम मॅग्झीनने पाच विभागात विविध कंपन्यांना ठेवले आहे. त्यात लीडर्स, डिसरप्टर्स, इनोवेटर्स, टाइटन्स आणि पायनियर्स असे विभाग आहेत. प्रत्येक विभागात 20 कंपन्या आहेत. रिलायन्स इंडिस्ट्रीज आणि टाटा ग्रुपला ‘टाइटन्स’ विभागात ठेवले आहे तर सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला ‘पायनियर्स’ विभागात ठेवले आहे.
टाइम मॅग्झीनने रिलायन्स इंडस्ट्रीजला ‘इंडियाज जगरनॉट’ टायटल दिले आहे. रिलायन्सची सुरुवात कपडा आणि पॉलिस्टर कंपनी म्हणून झाली. परंतु आज ती जगातील सर्वात मोठी आणि सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. रिलायन्सच्या यशाचे रहस्य विविध पोर्टफोलियो आणि धोरणात्मक गुंतवणुकीत आहे. टाइम मॅग्झीनने रिलायन्स आणि डिज्नी दरम्यान झालेल्या 8.5 अब्ज डॉलरच्या डिलचाही उल्लेख केला आहे. या डिलमुळे रिलायन्सची स्ट्रीमिंग सेक्टरवर मजबूत पकड निर्माण झाली आहे.
टाटा ग्रुपचा पोर्टफोलियोमध्ये स्टील, सॉफ्टवेअर, घड्याळी, केबल, मीठ, अन्नधान्य, रिटेल, इलेक्ट्रॉनिक्स, पावर, मोटर व्हिइकल, फॅशन आणि हॉटेल आहे. तसेच टाटा ग्रुपची टेक कंपनीने एआय आणि सेमीकंडक्टर सेक्टरमध्येही गुंतवणूक केली आहे. टाटा ग्रुप आयफोन असेंबल करणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे.
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला टाइम मॅग्झीनने ‘पायनियर्स’ कॅटेगरीत ठेवले आहे. कोविड-19 महामारी दरम्यान कोट्यावधी लोकांना सीरमने लस उपलब्ध करुन दिली. ही कंपनी दरवर्षी 3.5 अब्ज डोस बनवते. जागतिक पातळीवर कंपनीची यशोगाथा नोंदवली गेली आहे. टाइन मॅग्झीनने जगाचे लक्ष भारतातकडे वेधले आहे. भारतीय कंपन्यांच्या कामगिरींची नोंद घेत त्यांचा गौरव केला आहे.