
भारताने अमेरिकेचा विरोध डावलून रशियाकडून कच्चा तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. भारतीय रिफायनरीना आता रशियाने नवीन फर्मान सोडले आहे. अमेरिकन डॉलर, संयुक्त अरब अमिरातचे दिरहम अथवा भारतीय रुपया नाही तर त्यांना या तेल खरेदीचे पेमेंट हे चीनच्या युआन या चलनात हवे आहे. यापूर्वी तेलाचे पेमेंट भारत डॉलर अथवा दिरहममध्ये करत होता. भारताने रुपया अथवा रुबल हे विनिमयाचे साधन ठेवावे अशी मागणी होत होती. त्याचवेळी रशियाने सौद्याची रक्कम ही चीनच्या युआनमधूनच द्यावी अशी आग्रही मागणी केली आहे. सध्या भारत आणि चीनचे संबंध चांगले होत आहेत. पण चीनला या मागणीमुळे अधिक फायदा होऊ शकतो याचाही भारत विचार करत आहे.
इंडियन ऑईलने केले युआनमध्ये पेमेंट
भारताची स्रवात मोठी तेल रिफायनरी, सरकारी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने रशियाकडून मोठी तेल खरेदी केली. त्यापोटी दोन ते तीन टप्प्यात जे पेमेंट केले ते युआनमध्ये करण्यात आले. वर्ष 2022 मध्ये युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर पश्चिमी देशांनी रशियावर अनेक प्रतिबंध लादले. तेव्हापासून तेल खरेदीदार कंपन्या अमेरिकन डॉलरऐवजी युआन अथवा युएई दिरहम सारख्या चलनातून पेमेंट करत होत्या. भारतीय कंपन्या दिरहममध्ये पेमेंट करत होत्या. आता त्या युआनमध्ये पेमेंट करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सरकारने केला होता हस्तक्षेप
वर्ष 2023 मध्ये काही भारतीय सरकारी रिफायनरींनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी केले होते. त्यावेळी युआनमध्ये त्याचे पेमेंट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारत आणि चीनचे संबंध चांगले नव्हते. तेव्हा सरकारने या व्यवहारावर चिंता व्यक्त केली आणि हे व्यवहार तात्काळ थांबवले. त्यानंतर चलन बदलवण्यात आले. पेमेंट करण्यात आले. काही खासगी तेल उत्पादक कंपन्यांनी तेव्हा सुद्धा चीनच्या युआनमध्ये सौदे केल्याचे समोर आले आहे.
डॉलरमध्ये तेलच्या किंमती निश्चित
एका व्यापाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पूर्वी दिरहम अथवा डॉलर युआनमध्ये बदलावा लागत होता. युआनला ही थेट रुबलमध्ये बदलता येते. त्याआधारे रशियन कंपन्यांना थेट पेमेंटची रक्कम मिळते. अनेक तेल खरेदीदार हा द्रविडी प्राणायम थांबवण्यास इच्छुक आहेत. ते थेट चीनच्या युआनमधून रशियन कंपन्यांना देयके देण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांचा खर्च वाचणार आहे.
तर दुसरीकडे चीनच्या युआनप्रमाणे रुबलशी भारतीय रुपया थेट विनिमय का केल्या जाऊ शकत नाही, असा सवालही विचारण्यात येत आहे. रुबल आणि रुपयाचा विनिमय दरातील तफावत दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी चर्चा करावी अशी मागणी करण्यात येत आहे. चीनवर भरवसा ठेवणे महागात पडू शकते. त्यामुळे या देशाच्या चलनात सौदे न करण्याची मागणीही करण्यात येत आहे.