
Cupid Condom Company: शेअर बाजारात जबरदस्त रिटर्न देणाऱ्या कंपन्यांची नेहमी चर्चा होते. काही कंपन्या त्यांच्या जोरदार प्रदर्शनामुळे गुंतवणूकदारांना मालामाल करतात. या कंपन्या चर्चेत येतात. अशीच कामगिरी Cupid Limited या कंपनीने केली आहे. ही कंपनी कंडोम तयार करते. गेल्या एका वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. बाजारात पडझडीचे सत्र असतानाही या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. एकाच वर्षात अनेक गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे.
एका वर्षात 441% टक्क्यांची वाढ
गेल्या 12 महिन्यात Cupid Limited चा शेअर जवळपास 441% नी वधारला आहे. म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याला चारपट फायदा झाला असता. 9 जानेवारी रोजी कंपनीचा शेअर जवळपास 424 रुपयांवर बंद झाला. तर या एका महिन्यापूर्वी या शेअरने जवळपास 11% आणि गेल्या सहा महिन्यात जवळपास 288% तुफान परतावा दिला आहे. दीर्घकाळ गुंतवणूकदारांना, गेल्या 5 वर्षात या शेअरने जवळपास 3440% परतावा दिला आहे.
कंपनीचा मार्केटमध्ये दबदबा
Cupid Limited केवळ कंडोम तयार करण्यापूरती मर्यादीत नाही. ही कंपनी संपूर्ण हेल्थ केअर उत्पादनं तयार करते. कंपनी पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठी कंडोम तयार करते. याशिवाय ही कंपनी वॉटर-बेस्ड लुब्रिकेंट जेली आणि IVD किट तयार करते. या कंपनीची उत्पादन क्षमता अधिक आहे. प्रत्येक वर्षी कंपनी मोठ्या प्रमाणात कंडोम आणि लुब्रिकेंट तयार करते. हे उत्पादन भारतातच नाही तर परदेशातही विक्री होते. Cupid Limited ची सुरुवात 1993 मध्ये महाराष्टात झाली. 1998 मध्ये कंपनीला परदेशातून पहिली ऑर्डर मिळाली. आता या कंपनीने परदेशी बाजारातही ओळख तयार केली आहे. ही कंपनी लवकरच बोनस शेअर अथवा इतर चांगली घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य कुमार हलवासिया हे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. दक्षिण आफ्रिकेतून या कंपनीला सर्वात अगोदर कंडोम उत्पादनासाठी ऑर्डर मिळाली होती. त्यानंतर कंपनीची घोडदौड सुरूच आहे. ही कंपनी आता कंडोमसह हेल्थ सेक्टरमध्ये सक्रीय झाली असून आता विविध उत्पादनं बाजारात आणण्यात येत आहे.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.