SHARE TRACKER : सेन्सेक्स 433 अंकांनी वधारला, आयटी स्टॉक्समध्ये बूम; गुंतवणुकदार नफ्यात

| Updated on: Jun 27, 2022 | 7:59 PM

सेन्सेक्स 433 अंकांच्या वाढीसह 53,161 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी 133 अंकांच्या वाढीसह 15832 चा टप्पा पार केला.

SHARE TRACKER : सेन्सेक्स 433 अंकांनी वधारला, आयटी स्टॉक्समध्ये बूम; गुंतवणुकदार नफ्यात
शेअर बाजार
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : जागतिक अर्थकारणातील घडामोडींचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Indian Share Market) दिसून आला. आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स (Sensex) व निफ्टी दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये 450 अंकांच्या दरम्यान तेजी नोंदविली गेली. निफ्टीनं 15800 अंकांचा टप्पा पार केला. आजच्या व्यवहारादरम्यान चौफेर खरेदीचं सत्र राहिलं. बँक, फायनान्स आणि आयटी शेअर्समध्ये (IT Shares) मोठ्या प्रमाणात खरेदीचा ओघ राहिला. निफ्टी वर आयटी निर्देशांक 2 टक्क्यांनी बळकट झाला. बँक आणि फायनान्शियल्स निर्देशांकात अर्ध्या टक्क्यांची तेजी नोंदविली गेली. मेटल, ऑटो, फार्मा, एफएमसीजी सहित अन्य निर्देशांक वधारले. सेन्सेक्स 433 अंकांच्या वाढीसह 53,161 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी 133 अंकांच्या वाढीसह 15832 चा टप्पा पार केला.

वधारले-घसरले?

सेन्सेक्स वर 30 पैकी 27 शेअर्स वधारले. आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये एचसीएल HCL, टेकएम TECHM, विप्रो Wipro, इन्फोसिसInfosys, एल अँड टी LT, भारतएअरटेल BHARTIARTL आणि इंडसइंड बँक INDUSINDBK यांचा समावेश होतो.

झोमॅटो डाउन!

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये घसरण नोंदविली गेली. आज झोमॅटोचा शेअर 5 टक्क्यांच्या घसरणीसह 67 रुपयांवर पोहोचला. गेल्या आठवड्याच्या अखेरीस शुक्रवारी 71 रुपयांवर बंद झाला होता. झोमॅटोने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळानं क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंक कॉमर्स च्या 33,018 इक्विटी शेअर्सच्या खरेदीला ग्रीन सिग्नल दिला आहे.

बाजारावर मंदीचं सावट?

शेअर बाजारातील स्थितीबाबत जियोजित फायनान्शियल सर्व्हिसचे रिसर्च हेड विनोद नायर यांनी भाष्य केलं आहे. वस्तूंच्या किंमती सातत्यानं घसरत आहे. बाजारात तेजीचं चित्र असलं तरी मंदीचं सावट नाकारता येत नसल्याचे नायर यांनी म्हटलं आहे. आगामी काळात महागाईच्या आकडेवारीवर शेअर बाजाराची दिशा अवलंबून असेल. शेअर बाजारात स्थिरता येईपर्यंत तेजी-घसरणीचं चित्र कायम असेल असं नायर यांनी स्पष्ट केलं आहे.

बाजाराची दिशा, गुंतवणुकदारांना आशा

शेअर बाजारात गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासून तेजीचं चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात तेजी राहिल्यानं गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचं धोरण, महागाईचे आकडे यावर शेअर बाजाराची दिशा अवलंबून राहणार असल्याचं मतं अर्थजाणकारांनी वर्तविलं आहे.