
या नवीन वर्षात शेअर बाजाराचा मूड काही केल्या ठीक होताना दिसत नाही. अनेक दिग्गज गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. काहींचा पोर्टफोलिओ तर पूर्णपणे लाल झाला आहे. तर अनेक तज्ज्ञ बाजारात हिमत न हारण्याची आणि धीर धरण्याचा सल्ला देत आहेत. काही वर्षांपूर्वी असेच धैर्य दक्षिणेतील या तरुणाने दाखवले आणि चमत्कार झाला.तरुण वयातच या युवकाला केवळ 2,500 रुपये मासिक पगार होता. त्याला शेअर बाजारातील श सुद्धा माहिती नव्हता. तो आज शेअर बाजारामुळे 215 कोटींचा मालक झाला आहे.
अवघ्या 16 व्या वर्षी सोडावे लागले घर
पोरिंजू वेलियाथ (Porinju Veliyath) यांची यशोगाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे. त्यांना स्मॉल कॅप किंग या नावाने ओळखतात. वेलियाथ यांनी दोन-अडीच हजारांच्या नोकरीत स्टॉक मार्केटमध्ये 120 कोटींचे साम्राज्य उभारले. पोरिंजू वेलियाथ यांचा जन्म 1962 मध्ये केरळमधील कोच्चीमध्ये झाला. त्रिशूर हे त्याचे गाव आहे. घरी थोडीफार शेतीवाडी होती. त्यावरच कुटुंबियांची गुजराण होत होती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अगदी कमी वयात त्यांना गाव सोडावे लागले. 16 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि नोकरीला सुरुवात केली.
एक हजारांचा जॉब
हिशोबनिस म्हणून त्यांनी पहिला जॉब केला. त्यासाठी त्यांना 1,000 रुपये महिना मिळत होता. पुढे पगार 2,500 रुपये झाला. सुरूवातीला जिथे ते नोकरी करायचे तिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था नव्हती. एक कोपर्याचा त्यांना आसरा घ्यावा लागला. मग 1990 मध्ये ते मुंबईत कोटक सिक्युरिटीजमध्ये फ्लोर ट्रेडर म्हणून रूजू झाले. त्यांना रिसर्च ॲनालिस्ट आणि फंड मॅनेजर या पदाचा इथेच अनुभव मिळाला. या काळात त्यांनी शेअर बाजाराची सर्व बारीक सारीक माहिती टिपली. त्यानंतर ते मुंबई सोडून गावी परतले.
कोच्चीत स्वत:ची फर्म
शेअर बाजाराची बाराखडी पक्की झाल्यावर ते कोच्चीत परतले. याठिकाणी त्यांनी 2002 मध्ये इक्विटी इंटेलिजेंस नावाने मनी फंड मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. त्यांनी अनेकांना पोर्टफोलिओ सुधारण्यासाठी आणि नव्याने तो सुरू करण्यासाठी मदत सुरू केली. पुढे त्यांनी आर्य वैद्य फार्मसी नावाने कंपनी सुरु केली. ही कंपनी हिंदुस्तान यूनिलिव्हर लिमिटेड (HUL) सोबत लिव्हर आयुष्य या ब्रँडच्या नावाने आयुर्वेदिक उत्पादनं तयार करते. ‘The Complete Step-by-Step Guide to the Stock Market and Investing’ या नावाने त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलं आहे.