भारताच्या शत्रूंना यमसदनी कोण पाठवतंय? कुलभूषण जाधव यांचं अपहरण करणारा मुफ्ती शाह मीर याची गोळ्या झाडून हत्या
Mufti Shah Mir Killed : मुफ्ती शाह मीर हा अनेक वर्षांपासून पाकिस्तानी लष्करासाठी हेरगिरी करत होता. तर सोबतच तो जमियत-उलमा -ए-इस्लाम नावाच्या एका इस्लामी कंट्टरपंथीय राजकीय गटाचा सदस्य सुद्धा होता. त्याचा खात्मा झाला आहे.

पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये (Baluchistan) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मुफ्ती शाह मीर याची गोळ्या झाडून हत्या केली. याच मुफ्तीने कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुफ्ती मशिदीमधून नमाज पठण करून बाहेर पडला होता. त्यावेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. मुफ्ती हा मानवी तस्करीत सुद्धा सहभागी होता. मुफ्ती शाह मीर हा अनेक वर्षांपासून पाकिस्तानी लष्करासाठी हेरगिरी करत होता. त्याचे ISI या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेसोबत चांगले संबंध होते. बलूच भागातील माहिती, टीप तो लष्कराला देत होता. तर सोबतच तो जमियत-उलमा -ए-इस्लाम नावाच्या एका इस्लामी कंट्टरपंथीय राजकीय गटाचा सदस्य सुद्धा होता. त्याचा खात्मा झाला आहे.
कुलभूषण जाधव यांचे अपहरण
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना मार्च, 2016 मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी अटक केली होती. जाधव हे भारतीय गुप्तहेर असल्याचा ठपका पाकिस्तानने ठेवला होता. ते रिसर्च अँड एनिलिटिक RAW या संस्थेसाठी काम करत असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते. त्यांना हेरगिरी करताना पकडल्याचा शेजारी देशाचा दावा होता. केंद्र सरकारने जाधव यांचे इराणमध्ये अपहरण करून त्यांना बलूचिस्तानमध्ये अटक केल्याचा पाकिस्तानचा बनाव असल्याचा दावा केला होता.
कुलभूषण हे सेवानिवृत्तीनंतर चाबहार बंदरातून व्यापार करत होते. मार्च 2016 मध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर इराणच्या चमन भागातून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानमध्ये नेण्यात आले. त्यांना पाकिस्तानात हेरगिरी करताना पकडल्याचा आरोप लावण्यात आला. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने लागलीच त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली. भारताला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि पाकिस्तानच्या सरकारची ही मोठी योजना होती.
कुलभूषण यांचे अपहरण करण्यात सर्वात मोठी भूमिका या मुफ्ती शाह मीर यानेच निभावली होती. त्यानेच इराणमध्ये त्यांना किडनॅप केले होते आणि बलूचिस्थान येथे आणले होते. त्यानंतर जाधव यांना सोडण्यासाठी भारताने मुत्सेद्दिगिराचा वापर केला होता. हे प्रकरण हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयापर्यंत पोहचले. पाकिस्तानमधील विशेष न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण भारताने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचवल्यानंतर त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानला या शिक्षेचे पुनरावलोकन करण्याचे आणि भारताला बाजू मांडू देण्याचे आदेश दिले होते.
