
एफडीमध्ये गुंतवणूक इतर योजनांच्या तुलनेत नेहमीच सुरक्षित मानली जाते. परंतू भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केलीय तेव्हापासून देशातील सर्व मोठ्या बँकांनी एफडी रेट्समध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. एफडीमधून लोकांना मिळणारा फायदा कमी झाला आहे. परंतू, जर तुम्हाला सुरक्षित जागी गुंतवणूक करायची असेल तर काही सरकारी स्कीम तुमच्यासाठी चांगला पर्याय आहेत. ज्यात झिरो रिस्क आहे आणि निश्चित परतावा आहे.
किसान विकास पत्र भारत सरकारची एक बचत योजना आहे. ज्यात ७.५ टक्के व्याज मिळत आहे. या योजनेची खास बाब म्हणजे यात गुंतवलेली रक्कम ११५ महिन्यात ( ९ वर्षे ७ महिने ) दुप्पट होते. हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय असून त्यात परताव्याची गॅरंटी आहे. या योजनेत किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. कमाल रकमेची मर्यादा नाही. यात आयकर अधिनियम १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट आहे. अधिक माहीतीसाठी तुम्ही पोस्टात वा कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवर या संदर्भातील माहीती वाचू शकता.
सुकन्या समृद्धि योजना भारत सरकारची एक बचत योजना आहे.यात कन्येच्या भविष्यासाठी पैसा गुंतवता येतो. मुलीचे शिक्षण आणि लग्नासाठी यात पैसा गुंतवता येतो. या स्कीममध्ये १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते त्यांचे पालक काढू शकतात. यात वर्षाला किमान २५० रुपयापासून कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत जमा करता येते. यासाठी खाते बँकेत वा पोस्टात काढता येते. योजनेची परिपक्वता कालावधी मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत वा १८ वर्षांच्या वयानंतर लग्न होईपर्यंत आहे. आयकर अधिनियम, १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये ७.४ टक्के व्याज दरावर गुंतवणूकदाराला परतावा मिळतो. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे. यात किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. आणि १००० रुपयांच्या पटीत रक्कम गुंतवता येते. सिंगल अकाऊंटसाठी कमाल मर्यादा ९ लाख रुपये आणि जॉईंट अकाऊंटसाठी १५ लाख रुपयांची मर्यादा आहे.
नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये ७.७% वार्षिक व्याज दर मिळत आहे. या योजनेची परिपक्वता काळ ५ वर्षांचा आहे. यात किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. कमाल मर्यादा नाही. NSC मध्ये मिळणाऱ्या व्याजावर आयकर द्यावा लागतो.
ही योजना निवृत्तीनंतर वरिष्ठ नागरिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आहे. यात ८.२ टक्के असा आकर्षक व्याज दर मिळतो. ६० वर्षांहून अधिक वयोगटाच्या लोकांना या योजनेत गुंतवणूक करता येते. किमान जमा रक्कम १००० रुपये आणि कमाल ३० लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. यात देखील आयकर अधिनियम कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सुट मिळते.