अबब! देशातील बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडे 50 हजार कोटी रुपयांची बेवारस रक्कम

| Updated on: Jul 28, 2021 | 9:46 AM

Insurance Companies | केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 8.1 कोटी खात्यांमध्ये 24,356 कोटी रुपये पडून आहेत. याचा अर्थ सरासरी प्रत्येक खात्यामध्ये 3000 रुपये पडून आहेत. अनेक लोक विमा पॉलिसी सुरु करतात. मात्र, दोन-चार प्रीमियम भरल्यानंतर ते पॉलिसी बंद करतात.

अबब! देशातील बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांकडे 50 हजार कोटी रुपयांची बेवारस रक्कम
बँकांमध्ये कोट्यवधींची बेवारस रक्कम
Follow us on

नवी दिल्ली: देशातील बँका आणि विमा कंपन्यांकडे जवळपास 50 हजार कोटींची रक्कम बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती पुढेल आली आहे. याशिवाय, म्युच्युअल फंडस आणि भविष्य निर्वाह निधीमध्येही कोणीही दावा न केल्यामुळे कोट्यवधी रुपये पडून असल्याचे समजते. अनेकदा व्यक्ती एखाद्या सरकारी योजनेत किंवा बँकेत पैसे गुंतवतात. मात्र, अकाली मृत्यू झाल्यामुळे या पैशांवर दावा सांगायला कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे हे पैसे असेच पडून राहतात.

केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 8.1 कोटी खात्यांमध्ये 24,356 कोटी रुपये पडून आहेत. याचा अर्थ सरासरी प्रत्येक खात्यामध्ये 3000 रुपये पडून आहेत. अनेक लोक विमा पॉलिसी सुरु करतात. मात्र, दोन-चार प्रीमियम भरल्यानंतर ते पॉलिसी बंद करतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात भरलेले प्रीमियमचे पैसे विमा कंपन्यांकडेच राहतात.

बँकांमध्ये 24,352 कोटी रुपये पडून

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, भारतातील बँकांमध्ये आजघडीला 24,352 कोटी रुपये कोणत्याही दाव्याविना पडून आहेत. सध्याच्या घडीला भारतीय स्टेट बँकेत साधारण 2710 कोटी रुपये बेवारस स्थितीत आहेत. तर खासगी बँकामधील 90 लाख खात्यांमध्ये सरासरी 3340 रुपये पडून आहेत.

एखाद्या व्यक्तीचे बँक खाते 10 वर्षांपेक्षा अधिक काळ वापरात नसेल तर ते पैसे गुंतवणूकदार शिक्षण निधीत वळते केले जातात. देशभरातील बँकांमध्ये बंद पडलेल्या बचत खात्यांमध्ये जवळपास 5 कोटी रुपये पडून आहेत. तर वेगवेगळ्या आर्थिक योजनांमध्ये मॅच्युरिटीचा कालावधी उलटून गेल्यानंतरही दावा न सांगण्यात आलेल्या रक्कमेचा आकडा 4,820 कोटी रुपये इतका आहे.

या पैशांचं काय होतं?

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, बँकांमध्ये अशाप्रकारे बराच काळ पैसे पडून असतील तर त्याची माहिती RBI ला देणे बंधनकारक आहे. तुमचेही पैसे एखाद्या जुन्या बँक खात्यात अडकून पडले असतील तर तुम्ही योग्य ती माहिती देऊन हे पैसे परत मिळवू शकता. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा वारसदार बँक खात्यामधील रक्कमेवर दावा सांगू शकतो. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत किचकट असते.