Share Market : पाडव्यापूर्वीच गुंतवणूकदारांवर संक्रांत! शेअर बाजारात पुन्हा धूमधडाम, अदानी समूह ठरला सव्वाशेर

| Updated on: Mar 14, 2023 | 5:38 PM

Share Market : शेअर बाजाराने गेल्या आठवड्यानंतर पुन्हा आपला रंग दाखवला. बाजारात गुंतवणूकदारांची रक्कम स्वाहा झाली. बाजारावर आजही भीतीचे सावट होते. पण या काळात अदानी समूहाने तुफान फटकेबाजी करत यशश्री खेचून आणली.

Share Market : पाडव्यापूर्वीच गुंतवणूकदारांवर संक्रांत! शेअर बाजारात पुन्हा धूमधडाम, अदानी समूह ठरला सव्वाशेर
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेतील आर्थिक हालचालींचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market) दिसून येत आहे. अमेरिकेतील दोन मोठ्या बँकांना (American Bank) भलेमोठे कुलूप लागल्याने बाजारात भीतीची लहर उठली. त्यातच अमेरिकन केंद्रीय फेडरल रिझर्व्ह बँकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. त्याचा परिणाम युरोपसह भारतावरही दिसून येणार आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार आता डॉलर, इंधन सोडून सोन्याकडे वळाले आहे. त्याचा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. बीएसईवर (BSE Sensex) 30 शेअरचा निर्देशांक 1000 अंकांनी घसरला. एकावेळी तर स्टॉक बाजार 1200 अंकांनी घसरला. 8977 अंकाच्या घसरणीवर आज बाजार बंद झाला. गुंतवणूकदारांना पुन्हा कोट्यवधींचा फटका बसला.

अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीनंतर आता सिग्नेचर बँक बंद झाली. अमेरिकेत 2008 साल सारखी परिस्थिती उद्भवत असल्याचा तज्ज्ञांचा व्होरा आहे. मंदीची लाट येऊन आदळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचे धोरण आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. आज सकाळी भारतीय बाजाराने आनंदवार्ता दिली. बाजाराने हिरवे निशान फडकावले होते.

मंगळवारी, 14 मार्च रोजी, दुपारी 2:30 वाजता, भारतीय शेअर बाजाराचा निफ्टी बेंचमार्क इंडेक्स सर्वात निच्चांकी स्तरावर 17,130.45 अंकांवर व्यापार करत होता. या निर्देशांकात 1.62 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर बीएसईचा 30 अंकांचा निर्देशांक 1,023.28 अंकानी, 1.73 टक्क्यांनी घसरला. हा निर्देशांक 58, 111.85 अंकावर येऊन थांबला.

हे सुद्धा वाचा

दिवसभराच्या या डाबडुबलीच्या खेळात, 761 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर 2560 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 121 शेअर्सनी या घडामोडींवर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. आज सकाळी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली होती. बाजार उघडताच जवळपास 1091 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर 1048 शेअर्समध्ये घसरणीचे सत्र सुरु होते. त्यानंतर थोड्याच वेळात अमेरिकन घडामोडींची वार्ता येऊन धडकली.

अदानी समूहातील अप अँड डाऊन सध्या सुरुच आहे. पण बाजाराच्या विरुद्ध दिशेने हे शेअर्स प्रतिक्रिया नोंदवत आहेत. आज गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. या समूहाच्या चार शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागले. यामध्ये अदानी पॉवर 4.98 टक्के वधारुन, 215.10 रुपयांवर पोहचला. अदानी ग्रीन एनर्जी 4.99 टक्के तेजीसह 716.80 रुपयांवर व्यापर करत आहे. तर अदानी टोटल गॅस 5 टक्क्यांच्या वाढीसह 997.05 रुपयांवर तर अदानी ट्रान्समिशनमध्ये 5 टक्के वाढीसह 949.65 रुपयांवर व्यापार करत आहे. अदानी एंटरप्राईजेसचा शेअर 1.41 टक्के वाढून 1923 रुपयांवर व्यापार करत आहे. अदानी विल्मर्स 3.04 टक्के, अदानी पोर्ट्स 1.37 टक्के, एनडीटीव्ही 4.42 टक्के, अम्बुजा सिमेंट 1.41 टक्के तर एसीसी लिमिटेडमध्ये 3.73 टक्क्यांची घसरण दिसून आली.