Gold Rate Today : सोने 4 हजारांनी धडाम, चांदीमध्ये 8 हजारांची घसरण, दागिने खरेदीची हीच वेळ?
Gold Rate Today News : विक्रमी तेजीच्या काळात अचानक सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली. या बदलामागे काही महत्त्वाची कारणं आहेत, आता दागिने खरेदीचा निर्णय घेणं योग्य ठरेल का?

गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दराने विक्रमी पातळी गाठली होती. त्यामुळे लग्नसराईसाठी दागिने घेणाऱ्यांसह गुंतवणूकदारांचंही बजेट बिघडलं होतं. मात्र आता या दोन्हीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अवघ्या सात दिवसांत सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे. त्यामुळे सध्या खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही घसरण फायद्याची ठरणार आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,59,578 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे होता. आता तो 4694 रुपयांनी घसरून 1,54,884 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
22 कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे. गेल्या आठवड्यात 1,46,173 रुपये असलेला भाव आता 1,41,874 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर 18 कॅरेट सोनं 1,19,664 रुपयांवरून 1,16,163 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं आहे.
सोन्यासोबत चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला चांदीचा भाव सुमारे 2.43 लाख रुपये प्रति किलो होता. आता तो घसरून 2,35,456 रुपये प्रति किलोवर आला आहे. म्हणजेच किलोमागे 8,400 रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे.
सोनं-चांदीच्या दरातील या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील अनेक घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. त्याचवेळी अमेरिकेतील रोजगाराचे आकडे मजबूत आल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी झाल्याचं मानलं जात आहे. याशिवाय डॉलर आणि अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये मजबुती आल्याने सोन्यावर दबाव वाढला आहे. डॉलर मजबूत झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं तुलनेने महाग होतं आणि त्याच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो.
MCXवर ऑक्टोबर गोल्ड फ्युचर्स सध्या 1,52,851 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर सोन्यासाठी 4,330 ते 4,360 डॉलरचा सपोर्ट झोन महत्त्वाचा मानला जात आहे. तर MCX वर 1,51,500 ते 1,52,00 रुपयांची पातळी महत्त्वाची ठरू शकते. दीर्घकाळासाठी सोनं खरेदी करण्याचा विचार असेल तर सध्याची घसरण लक्षात घेण्यासारखी आहे. मात्र सोन्याच्या किमतीत पुढेही चढ-उतार होऊ शकतात.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)