Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी ठरेल फायदेशीर? डिजिटल रुपया मारेल बाजी, तज्ज्ञांचा दावा काय

| Updated on: Apr 13, 2023 | 8:11 PM

Cryptocurrency : भारतात क्रिप्टोकरन्सी तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. पण क्रिप्टोचे भारतातील भविष्य काय आहे, हा प्रश्न प्रत्येकाल सतावत आहे. काय डिजिटल रुपयाचे पारडे जड आहे...

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी ठरेल फायदेशीर? डिजिटल रुपया मारेल बाजी, तज्ज्ञांचा दावा काय
Follow us on

नवी दिल्ली : एका अंदाजनुसार, एकूण क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांमध्ये (Cryptocurrency Investors) 10 टक्के भारतीय आहेत. जगातील 20 कोटी गुंतवणूकदारांनी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केली आहे. जगभरात क्रिप्टो चलन कोणत्याही नियमाशिवाय बेधडक वापरण्यात येत आहे. भारतात क्रिप्टोच्या मुसक्या आवळण्यात येत आहे. त्याला नियमांच्या आणि कायद्याच्या परिभाषेत बसविण्यात येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान टळणार आहे. अवैध सावकारी प्रतिबंध कायद्याच्या (PMLA) अंतर्गत क्रिप्टोचा बाजार उठणार आहे.त्यातच भारतीय डिजिटल रुपयाची (Digital Rupee) मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. त्यामुळे भारतात क्रिप्टोचे भविष्य काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

TDS चे ओझे
भारतात क्रिप्टोच्या मुसक्या आवळण्यात येत आहे. भारतीय कायद्याच्या चौकटीत क्रिप्टो येणार नसेल, तर केंद्र सरकार त्याविरोधात कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. कारण देशातील लाखो गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी गुंतवणुकीचा हा प्रश्न आहे. क्रिप्टोच्या बेलगाम धोरणामुळे गुंतवणूकदार रस्त्यावर येतील. त्यासाठी आरबीआयने क्रिप्टोविरोधात कडक भूमिका घेतली आहे. सध्या तर क्रिप्टोच्या लाभावर गुंतवणूकदारांना टीडीएसही द्यावा लागत आहे. क्रिप्टो गुंतवणूकदारांना यामुळे कमाईचा हिशेब द्यावा लागणार आहे.

पारदशर्कता वाढली
क्रिप्टोच्या बाजारात कुठलीच पारदर्शकता नाही. हा बेलगाम बाजार आहे. त्याचे नियम आणि कायदे काहीच नाही. वरकरणी यात भरपूर फायदा दिसत असला तरी एकदमच दिवाळखोरीचे संकटही ओढावू शकते. त्यामुळे केंद्रीय रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोसाठी नियम आणि कायदे बांधून दिले. यामुळे पारदर्शक व्यवहाराला चालना मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

भविष्य काय
तज्ज्ञांच्या मते, जगात आता क्रिप्टोच्या पुढील व्यावसायिक आवृ्त्तीसाठी मोठे ब्रँड सरसावले आहे. हा व्यवसाय फार मोठा आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीला वेग येऊ शकतो. तसेच मदत मिळू शकते. त्यामुळे या व्यवसायातील त्रुटी दूर करुन त्याला अधिक गतिमान करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे.

भारतात स्थिती काय
तज्ज्ञांच्या मते, जगापेक्षा भारतात क्रिप्टो करन्सीचे भविष्य अधिक चांगले असेल. कारण नियम आणि कायद्याच्या बंधनात गुंतवणूकदारांचे संरक्षण होईल. नियमांच्या बंधनात न राहिल्यास मात्र या चलनाचे भारतातील भविष्य धोक्यात येईल. क्रिप्टो अस्थिर चलन आहे. परिणामी त्याच्या व्यापक उपयोगावर आपोआप बंधने येतात.

डिजिटल रुपयाची भूमिका
भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतीय डिजिटल चलन, ई-रुपया उतरवला आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सीने (CBDC) त्यासाठी सुरक्षित आणि वेगवान प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरु आणि भुवनेश्वर या शहरातील 50,000 किरकोळ विक्रेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. सध्या बँका, किरकोळ विक्रेते ई-वॅलेटच्या माध्यमातून हा प्रयोग प्रत्यक्षात येण्यासाठी चाचपणी करत आहेत. या प्रायोगिक प्रकल्पात आतापर्यंत 8 लाख रुपयांहून अधिकचा व्यवहार झाला आहे.