आयआयटीची नोकरी सोडली, दोघींनी स्टार्टअप सुरू करून डेअरी सेक्टरमध्ये उभारली 565 कोटींची कंपनी

आयआयटी दिल्लीच्या नीतू यादव आणि किर्ती जांगडा यांनी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधून त्यांनी स्टार्टअपची सुरुवात केली. आत त्यांच्या स्टार्टअपचं मूल्य अंदाजे 565 कोटी रुपये आहे.

आयआयटीची नोकरी सोडली, दोघींनी स्टार्टअप सुरू करून डेअरी सेक्टरमध्ये उभारली 565 कोटींची कंपनी
नीतू यादव, किर्ती जांगडा
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 25, 2026 | 2:47 PM

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (IIT) इंजीनिअरिंगचं शिक्षण केल्यानंतर जिथे विद्यार्थी मोठ्या टेक कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचं किंवा नवी टेक्नॉलॉजी स्टार्टअप सुरू करण्याचं स्वप्न पाहतात, तिथे आयआयटी दिल्लीच्या नीतू यादव आणि किर्ती जांगडा यांनी काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. त्यांनी गाव आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जुन्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी स्वत:चा स्टार्टअप सुरू केला. आज तेच स्टार्टअप कोट्यवधींची कंपनी बनली आहे.

नीतू आणि किर्ती या दोघी मैत्रिणी असून त्यांनी आयआयटी दिल्लीतून सिव्हिल इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. एकीने टेक्नॉलॉजी आणि प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये काम केलं, तर दुसरीने कंसल्टिंग आणि पब्लिशिंग सेक्टरमध्ये काम करत अनुभव मिळवला. दोघींच्या हाती चांगल्या पगाराची नोकरी असूनही त्यांना समाजासाठी काहीतरी वेगळं आणि नवीन करायचं होतं.

कुठून सुचली कल्पना?

नीतू यादव आणि किर्ती जांगडा यांना स्टार्टअपची कल्पना कुठून सुचली, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. आजकाल जवळपास सर्वकाही ऑनलाइन विकत घेता येतं आणि विकताही येतं. परंतु गायी आणि म्हशींची खरेदी-विक्री अजूनही पारंपरिक पद्धतीनेच केली जाते. त्यासाठी शेतकरी अजूनही मध्यस्थांवर अवलंबून आहेत, ज्यामुळे त्यांना योग्य भाव आणि विश्वासार्ह खरेदीदार मिळत नाहीत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी हा स्टार्टअप सुरू केला.

2019 मध्ये कंपनीची सुरुवात

नीतू आणि किर्ती यांनी 2019 मध्ये ‘अॅनिमल टेक्नॉलॉजी’ हा एक छोटा वीकेंड प्रोजेक्ट म्हणून सुरुवात केली. मोबाइल अॅपद्वारे शेतकऱ्यांना गायी आणि म्हशींची खरेदी-विक्री सहज आणि सुरक्षितपणे करता यावी, हे त्यांचं ध्येय होतं. परंतु सुरुवातीला सर्वकाही सोपं नव्हतं. कारण ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ग्रामीण रहिवाशांचा विश्वास संपादन करणं हे एक मोठं आव्हान होतं.

लाखो शेतकऱ्यांना फायदा

नीतू आणि किर्ती यांच्या या प्रोजेक्टवर हळूहळू शेतकऱ्यांचा विश्वास वाढत गेला आणि त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने विस्तारत गेला. आज या प्लॅटफॉर्मवर लाखो खरेदीदार आणि विक्रेते सहभागी झाले आहेत. आज हजारो जनावरं या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी सूचीबद्ध आहेत आणि हा प्लॅटफॉर्म हजारो शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह डिजिटल बाजारपेठ बनला आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. आज या कंपनीचं मूल्यांकन अंदाजे 565 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. विशेष म्हणजे यात कोणतंही नवीन तंत्रज्ञान तयार केलं गेलं नाही. जिथे डिजिटल बदलाची सर्वाधिक गरज होती, तिथे आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर या दोघी मैत्रिणींनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us